IMD Rain Forecast : महाराष्ट्रात तुफान पाऊस, पुढचे 24 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे, दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

IMD Rain Forecast : महाराष्ट्रात तुफान पाऊस, पुढचे 24 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना हाय अलर्ट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 17, 2025 | 10:04 PM

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे, याचा मोठा फटका हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात बसला आहे. मराठवाड्यामध्ये पावसाच्या तडाख्यानं शेतकऱ्यांच्या ऐन हातातोंशी आलेला घास हिरवला आहे. तसेच पावसामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुराचा देखील मोठा फटका बसला आहे. या पुरात अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे, शेतातील पिकं वाहून गेली आहेत, तर अनेकांचे संसार देखील उघड्यावर आले आहेत. दरम्यान अजूनही पावसाचा धोका टळलेला नाहीये, उद्या देखील अनेक भागांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून (IMD) जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यावर मोठं संकट

हवामान विभागाकडून 18 सप्टेंबर गुरुवारी देखील पावसाचा जोरदार इशारा देण्यात आला आहे, हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्यानुसार उद्या राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच ताशी तीस ते चाळीस प्रति किमी वेगानं वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यावर दुहेरी संकट असणार आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कुठे कुठे पावसाचा इशारा

कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग प्रति तास 30 ते 40 कीमी इतका असण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोकणामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, कोकणातील तीन जिल्हे सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरीमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर मुंबई आणि पालघरमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे.

दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यांमधील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, सोलापूरमध्ये पावसानं आधीच मोठं नुकसान झालं आहे, मात्र पुन्हा एकदा सोलापूरला देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भात तुफान पाऊस

दरम्यान विदर्भात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून विदर्भातील जवळपास सर्वाच जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.