IMD Weather Update : 17 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा, महाराष्ट्रालाही मोठा इशारा
भारतीय हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 17 राज्यांना हाय अलर्ट देण्यात आला असून, महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार आहे.

महाराष्ट्रात ऑगस्टचा संपूर्ण महिना आणि सप्टेंबर महिन्याचे पहिले दोन आठवडे पावसाने दडी मारली, त्यामुळे पावसाभावी परिस्थिती गंभीर बनली आहे. पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. मात्र आता दिलासादायक बातमी म्हणजे मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर पुढील 48 तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे, भारतीय हवामान विभागाकडून 25 सप्टेंबर रोजी देशातील 17 राज्यांना मुसळधार पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी शेतात काम करताना काळजी घ्यावी, तसेच या काळात मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देखील भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात तब्बल 85 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार असल्याचं देखील हवामान विभागाने म्हटलं आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या वादळाचा मोठा फटका हा ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांना बसणार असून, लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे. तसेच पर्वतीय प्रदेशा काही ठिकाणी लँडस्लाईडच्या घटना देखील घडू शकतात, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे. पूर्व भारतामध्ये पावसाचं रौद्र रूप पहायला मिळणार आहे, त्यामुळे या काळात गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
या राज्यांना हाय अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 25 सप्टेंबर रोजी 17 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू -काश्मीर, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 17 राज्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
महाराष्ट्रात देखील 25 सप्टेंबर रोजी चांगल्या पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, नागपूर, अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.