IMD Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट, उरले फक्त काही तास, आयएमडीचा पावसाबाबत मोठा इशारा

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरूच आहे, दरम्यान पुन्हा एकदा हवामान विभागाकडून आता पावसासंदर्भात मोठा इशारा देण्यात आला आहे.

IMD Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट, उरले फक्त काही तास, आयएमडीचा पावसाबाबत मोठा इशारा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 13, 2025 | 5:56 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकळी पाऊस पडत आहे, वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे उन्हाळी बाजरी, फळबागा आणि काद्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. अवकाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असून,  27 मेला मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे.  अंदमानमध्ये आठ ते नऊ दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे, तर केरळात देखील तीन ते चार दिवस आधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.  महाराष्ट्रात मान्सून नेमका कधी दाखल होणार हे आताच सांगता येणार नाही, असं यावेळी सानप यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  महाराष्ट्रात तापमान वाढल्यामुळे आणि आद्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस होत आहे, येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे, पुढील दोन दिवसांमध्ये  मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे, नागरिकांनी सतर्क राहावं अशी माहिती देखील यावेळी सानप यांनी दिली.

दुसरीकडे नाशिकमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे, इगतपुरी तालुक्यात सलग 6 व्या दिवशी अवकाळी पाऊस झाला आहे. विजेच्या कडकडाटासह व जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे, तालुक्यातील 87 हेक्टर शेती पावसामुळे बाधित झाली आहे. उन्हाळी बाजरी व भाजीपाल्याची पिके जमीनदोस्त झाली आहे, मात्र दुसरीकडे पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.