मोठी बातमी! दिल्लीत घडामोडींना वेग; सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेलांमध्ये बैठक, नेमकं काय घडतंय?
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. याच दरम्यान आता आज सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची दिल्लीमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्रमोद जगताप, प्रतिनिधी टीव्ही 9 : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान ही चर्चा सुरू असतानाच आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे, दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 35 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची बैठक झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची देखील बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सुत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार आज दिल्लीमध्ये संसद परिसरामध्ये सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या दोन नेत्यांमध्ये जवळपास 35 मिनिटं चर्चा झाली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये देखील बैठक पार पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्त्व प्राप्त झालं आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे रुग्णालयात असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला वेग आला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील विलिनीकरणाबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. विलिनीकरणाची सध्या कोणतीही चर्चा नाही, मात्र अजित पवार असते तर 12 फेब्रुवारी रोजीच विलिनीकरण झालं असतं, असं तटकरे यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर दोन्ही गटात घडामोडी सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. आज सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये 35 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. सध्या राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.