
आपल्या लहानग्या मुलीला सांभाळायला कोणी नसल्याने एका मातेने तिला सोबत घेऊन ऑटो रिक्षा चालवण्याची कसरत केली आहे. या महिलेची सासु आजारी असल्याने तिचे पती गावीच राहत आहेत. त्यामुळे तीन वर्षांची मुलगी तेजस्वी हीला सोबत ठेवूनच त्या दिवसभर रिक्षा चालवून अर्थार्जन करत असल्याने या मायलेकींचा अनोखा संघर्ष चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे आपल्या लहानग्या मुलीला सोबत बसवण्यासाठी त्यांनी रिक्षात स्वतंत्र आसन शेजारी बनवून घेतले आहे.
घरात मुलीला सांभाळण्यासाठी कोणी नाही. घराचे भाडे भरण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी जास्त शिक्षण नसल्याने अखेर कोमल गायकवाड यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. त्यांची तीन वर्षांची लाडकी लेक तेजस्वी त्यांच्यासोबत या रिक्षात बसलेली असते. कधी ती पुस्तक हातात घेऊन अभ्यास करत असते, तर कधी मोबाईलवर खेळत असते. या दोघी मायलेकींचा जगण्यासाठीचा अनोखा संर्घष कल्याण शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
आयुष्यातील कठीण आर्थिक परिस्थितीशी दोन हात करत आपल्या मुलीचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी कल्याणच्या कोमल गायकवाड या रिक्षा चालवत अर्थार्जन करत आहेत. विशेष म्हणजे त्या दिवसभर आपल्या तीन वर्षांच्या मुलगी तेजस्वीला सोबत घेऊन रिक्षा चालवतात. आर्थिक अडचणी, घरातील जबाबदाऱ्या आणि मुलीची काळजी या सगळ्यांशी झुंज देत त्या त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.
कोमल गायकवाड यांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आणि घर भाड्याचे असल्यामुळे त्यांना कुटुंबाचा भार उचलावा लागत आहे. त्यांची सासू आजारी असल्यामुळे त्यांचे पती गावी राहतात. त्यामुळे मुलीची काळजी घेण्यासाठी घरी कोणीही नसल्याने कोमल गायकवाड यांना मुलीला सोबत घेऊनच काम करावे लागत आहे. सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत त्या रिक्षा चालवत काबाडकष्ट करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.
शिक्षण कमी असल्यामुळे आणि लहान मुलीला सोबत घेऊन कोणीही काम देण्यास तयार नसल्याने त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.रिक्षा चालवताना मुलीची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेऊन त्यांनी रिक्षामध्ये मुलीसाठी खास बसण्याचा स्टँड तयार करून घेतला आहे. त्या स्टँडमध्ये तेजस्वी त्यांच्या शेजारी आरामात बसते आणि त्यामुळे प्रवाशांनाही प्रवासादरम्यान कोणताही त्रास होत नाही.दिवसभर कष्ट करणाऱ्या या माय-लेकरांची जोडीला अनेकजण पाहातात आणि त्यांची विचारपूस करतात. माझ्यावर जशी परिस्थिती आली तशी माझ्या मुलीवर येऊ नये, तिला चांगले शिक्षण देऊन पोलीस अधिकारी बनवायचे आहे, असे कोमल गायकवाड यांनी म्हटले आहे.