वाऱ्याने मंडप उडून गेला, स्वयंपाक भिजला, तरीही भर पावसात शुभमंगल सावधान झाले !

वादळी पाऊस आला,मांडव उडाला,पावसांच्या धारात विवाह पार पडला. वधूवरांवर छत्रीचा आधार देत मंगलाष्ठका घुमल्या आणि वधू-वरांचे शुभमंगल थाटात पार पडले.

वाऱ्याने मंडप उडून गेला, स्वयंपाक भिजला, तरीही भर पावसात शुभमंगल सावधान झाले !
wedding took place amidst heavy rain
| Updated on: May 07, 2026 | 9:16 PM

नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलं. मात्र या पावसाचा फटका लग्न समारंभालाही बसला. जोरदार वाऱ्यासह नेमकी पावसाची सर अशी काही आली की मंडपच उडून गेला. त्यामुळे विवाहाची घटिका समीप आली तरी पाऊस काही थांबण्याचे नाव घेईना. अखेर छत्री धरुनच भटजी बुवांनी मंगलाष्ठका म्हटल्या आणि वऱ्हाडी मंडळींनी अक्षता टाकल्या हे शुभमंगल पार पडले.

नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका लग्न समारंभालाही बसला. त्यामुळे वधूवरांवर छत्री धरून विवाह सोहळा आटोपण्याची वेळ निसर्गाच्या अवकृपेमुळे वऱ्हाडी मंडळींवर आली. माहूर तालुक्यातील लखमापूर येथे गुरुवारी वधू श्रावणी जाधव आणि माहूर येथील अर्जुन राठोड यांचा विवाह आयोजित केला होता. अक्षता टाकण्यासाठी वऱ्हाडींची लगबग सुरु असतानाच अचानक आलेल्या वादळी पावसाने लग्न मंडपाची धूळधान उडाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मंगल कार्यांसाठी उभारलेला लग्न मंडप उडून गेला. सर्व स्वयंपाक भिजला, पण सर्व गावाकऱ्यांनी जिद्दीच्या जोरावर वधू श्रावणी आणि वर अर्जुन यांचा विवाह भर पावसात छत्रीचा आधार देऊन लावून दिला.

‘ कुर्यात सदा मंगलम’

पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. अखेर एका हाताने छत्री सावरत आणि दुसऱ्या हाताने विधी उरकत या जोडप्याचे लग्न आटोपण्यात आले. नवरी-नवरदेवाच्या डोक्यावर छत्र्या धरून भटजींनी मंत्रोच्चार केले. भर पावसात ‘ कुर्यात सदा मंगलम’ चा आवाज घुमला आणि श्रावणी-अर्जुनने एकमेकांच्या गळ्यात लग्नमाळ घातली. वऱ्हाडी मंडळींनी पावसाची पर्वा न करता भर पावसात उभे राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले.

पावसाने हळदीचे मोठे नुकसान

नांदेड जिल्ह्यात वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे . शिजवून शेतात वाळत घातलेली हळद भिजून खराब झाली. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील हळद उत्पादक शेतकरी पांडुरंग मुसळे यांनी तीन एकर हळद शिजवून वाळू घातली होती. अवकाळी पावसामुळे मुसळे यांची तीन एकर हळद भिजून नुकसान झाले.

येथे पाहा व्हिडीओ –

पावसाचा येलो अलर्ट

हवामान खात्याने गुरुवारी नांदेड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केला होता. सकाळ पासूनच आभाळ झाकोळुन आले होते. दुपारच्या सुमारास हदगाव, तामसा , हिमायतनगर भागात पाऊस झाला. जिल्हयात अन्य ठिकाणी देखील पावसाच्या सरी बरसल्या. हदगाव , हिमायतनगर भागात वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. शहरात देखील पावसाने हजेरी लावली.

Follow Us