
नांदेड (राजू गिरी) : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात 12 नवजात बालकांचा समावेश आहे. नांदेडच्या या घटनेवरुन राज्यात आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाल्याच स्पष्ट होतं. आरोग्य सुविधांची अवस्था काय आहे? परिस्थिती किती गंभीर आहे? हेच यातून दिसून येतय. या प्रकारानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर चहूबाजूंनी टीका सुरु झाली आहे. शासकीय रुग्णालयात एकाचवेळी इतक्या रुग्णांचा मृत्यू होण्याची ही पहिली घटना नाहीय. यापूर्वी कळ्व्यातील एका रुग्णालायत एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आपल्या आप्तस्वकीयांना गमावल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी काही गंभीर आरोप केले आहेत.
औषधाच्या तुटवड्यामुळे रुग्णांनी प्राण गमावले असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केलाय. रुग्णालयात सीटी स्कॅन, सोनोग्राफी, रक्ता तपासणी सुविधा नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. वैद्यकीय शिक्षण खात्याच आरोग्य पथक चौकशीसाठी रवाना होणार आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी या शासकीय रुग्णालयाला भेट दिली.
वैद्यकीय शिक्षण मंत्री काय म्हणाले?
याच रुग्णालयात आणखी 70 रुग्ण अत्यवस्थ आहेत. या रुग्णांना वाचवण्यासाठी काम करणं आवश्यक आहे असं अशोक चव्हाण म्हणाले. कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, औषध तुटवडा ही कारण असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केलाय. आरोग्य पथक येऊन चौकशी करेल. दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होईल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. दरम्यान शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचं लोण छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचल आहे. छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात मागच्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 10 मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश आहे.