पंढरपूरात विहीर खोदताना कठडा कोसळून कामगार गाडले गेले,12 तासानंतर एका मजूराचा मृतदेह बाहेर काढण्यात यश
शेतात विहीर खणण्याचे काम सुरु असताना पंढरपूरातील आंबे गावात विहीराचा कठडा कोसळल्याने मातीच्या ढीगाऱ्या चार कामगार अडकल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या मजूरांना शोधण्याची मोहीम सुरु असून त्यात १२ तासांनंतर एका मजूराचा मृतदेह हाती लागला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात आंबे गावात विहीर खोदताना कठडा कोसळल्याने यात चार कामगार मातीच्या ढीगाऱ्यात गाडले गेल्याची घटना घडली होती. या ठिकाणी गेल्या १२ तासांपासून बचाव कार्य सुरु असून आता अखेर रात्री एका मजूराचा मृतदेह सापडल्याची घटना घडली आहे. या खोदकामात मातीच्या ढीगाऱ्या खाली आणखीन तीन जण सापडल्याचे म्हटले जात असून त्यांचा शोध अद्यापही सुरु आहे. या ठिकाणी एनडीआरएफची टीम आणि प्रशासनाचे कर्मचारी पोकलेन आणि जेसीबी मशीनच्या सहाय्याने ढीगारा उपसून काढत आहेत.
१२ तासानंतर एका मजूराचा मृतदेह सापडला
पंढरपूरातील आंबे गावात शेतात विहीर खणताना अचानक विहीरीचा कठडा कोसळल्याची घटना सकाळी घडली होती. या दुर्घटनेत चार मजूर आता विहिरीच्या आता गाडले गेल्याची भिती व्यक्त होत होती. त्यानंतर या ठिकाणी सोलापूरच्या जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन हे स्वत: घटनास्थळी हजर राहून बचाव मोहिम सुरु करण्यात आली. या कामगारांना सुखरुप काढण्यासाठी एनडीआरएफची टीम आणि आपात्कालिन टीमचे जवान गेल्या १२ तासांपासून अखंड मेहनत घेत होते. मात्र, १२ तासानंतर एका मजूराचा मृतदेह सापडल्याची घटना घडली आहे.
घटनास्थळीच पोस्टमार्टेम
एनडीआरएफ आणि बचाव पथकाच्या टीमला १२ तासांच्या अथक मेहनतीनंतर या ठिकाणी एका दगडाच्या ढीगार्याखाली अडकलेला कामगाराला बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. या मजूराचे नाव सिद्धेश्वर घाडगे असे असून त्याचे आता जागेवरच पोस्टमार्टेम सुरु करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी या कामगाराला मृत घोषीत केले आहे. या ठिकाणी आता आणखी तीन मजूर आत अडकले असल्याचे माहिती आहे. त्यांचा शोध देखील सुरु आहे. रात्र झाल्याने येथे विद्युत प्रकाश यंत्रणा, आणि पोकलेन तसेच जेसीबी मशिन लावून या कामगाराचा शोध घेण्याची मोहिम सुरु आहे. एनडीआरएफच्या टीमला पोहचायला अनेक तास उशीर झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या ढीगाऱ्यातील चार कामगार अडकले असून त्यातील एका कामगाराचा मृतदेह सापडला आहे.