सोलापुरात वंचितच्या उमेदवारानं घेतलेली माघार कोणासाठी फायद्याची ठरणार?

| Updated on: Apr 22, 2024 | 9:27 PM

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांचा चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. काहीची उमेदवारी रद्द करण्याची वेळ देखील वंचितवर आली. तर काही ठिकाणी वंचितने आपला उमेदवार बदलला आहे. काही ठिकाणी वंचितला पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागली आहे.

सोलापुरात वंचितच्या उमेदवारानं घेतलेली माघार कोणासाठी फायद्याची ठरणार?
solapur loksabha
Follow us on

Solapur : सोलापुरात वंचितच्या उमेदवारानं माघार घेतली आहे. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढू शकते. तर काँग्रेसला दिलासा मिळू शकतो. काही उमेदवारींवरुन वाद झालेला असतानाच वंचितच्या 2 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपचा उमेदवार जिंकू नये म्हणून सोलापुरात वंचितचे उमेदवार राहुल गायकवाडांनी माघार घेतली आहे. आपल्यामुळे भाजपलाच फायदा होईल अशा सूर उमटल्यामुळे जळगावातील वंचितचे उमेदवार प्रफुल्ल लोढांनी माघार घेतली. तर अमरावतीत वंचितच्या काही पदाधिकाऱ्यांनी उमेदवार योग्यतेच्या निकषावर काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंना पाठिंबा दिला.

भाजपची डोकेदुखी वाढणार?

सोलापुरातून वंचित उमेदवारानं घेतलेली माघार काँग्रेससाठी फायद्याची तर भाजपसाठी डोकेदुखी बनू शकते. कारण 2019 च्या निवडणुकीत एमआयएम-वंचितच्या युतीनं घेतलेल्या मतांमुळे भाजपचा विजय सोपा झाला होता. गेल्यावेळी भाजपनं काँग्रेसचा 1 लाख 58 हजार मतांनी पराभव केला होता. यात वंचितनं घेतलेली 1 लाख 70 हजार मतं निर्णायक ठरली होती. अमरावतीत वंचितच्या उमेदवारीवरुनही गोंधळ पाहायला मिळाला.

वंचितमध्ये गोंधळाचे वातावरण

अमरावतीत वंचितनं आधी प्राजक्‍ता पिल्‍लेवान यांना उमेदवारी जाहीर केली. 2 एप्रिलला रिपल्बिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकरांनी उमेदवारी अर्ज भरला. यानंतर वंचितनं आपली उमेदवारी मागे घेत रिपब्लिकन सेनेला पाठिंबा दिला. मात्र प्रत्यक्षात वंचितचे स्थानिक पदाधिकारी सोबत नसल्याचा आरोप करत आनंदराज आंबेडकरांनीच अर्ज मागे घेण्याची भूमिका घेतली. नंतर मात्र आनंदराज आंबडेकरांनी अर्ज कायम ठेवला. त्यानंतर रिपब्लिकन सेनेतला पदाधिकाऱ्यांवर आरोप करत वंचितच्या काही पदाधिकाऱ्यांनीच काँग्रेसच्या वानखेडेंना पाठिंबा दिलाय त्यामुळे वंचितनं जिल्हाध्यक्षासह इतर काही अधिकाऱ्यांना बडतर्फ केलंय.

म्हणजे याआधी भाजप जिंकू नये म्हणून अर्ज मागे घेत असल्याची भूमिक आनंदराज आंबेडकरांनी घेतली होती. त्यानंतर वंचितमधून बंड केलेल्या पदाधिकाऱ्यांनी भाजप जिंकू नये म्हणून काँग्रेसच्या वानखेडेंना पाठिंबा दिलाय.

शिरुर लोकसभेतही वंचितला उमेदवार बदलावा लागला. शिरुरमधून आधी मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली होती., त्यावरुन वंचितवर टीका सुरु झाल्यानंतर त्यांना उमेदवार रद्द करण्याची वेळ आली.

14 फेब्रुवारीला बांदल तिकीटाच्या इच्छेनं शरद पवारांच्या भेटीसाठी आले होते. 21 मार्चला बांदल सांगलीत ठाकरेंच्या मंचावर होते. 29 मार्चला बांदल सागर बंगल्यावर फडणवीसांना भेटले. 1 एप्रिलला बांदल पुण्यात भाजपच्या प्रचारात होते. 3 एप्रिलला त्याच बांदलांना वंचितनं तिकीट दिलं. 5 एप्रिलला वंचितचे उमेदवार असूनही बांदल इंदापुरात फडणवीसांच्या भेटीला गेले. भाजपचा माणूस वंचितचा उमेदवार कसा या टीकेनंतर 6 एप्रिलला वंचितनं बांदलांची उमेदवारी रद्द केली. आणि परवा 20 एप्रिलला बांदल महायुतीच्या मंचावरुन भाजप-शिवसेनेचा प्रचार करत आहेत.