राज्यावर संकट, पुढील 24 तास धोक्याचे, भारतीय हवामान विभागाकडून मोठा इशारा

Maharashtra Rain Update : राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. मात्र, पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. सततच्या पावसामुळे हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचेही बघायला मिळतंय.

राज्यावर संकट, पुढील 24 तास धोक्याचे, भारतीय हवामान विभागाकडून मोठा इशारा
Rain
| Updated on: Sep 18, 2025 | 8:35 AM

राज्यात गे्ल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय. मुंबईमध्ये सकाळीच पावसाने जोरदार हजेरी लावली. बंगालच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सध्या पाऊस सुरू आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूरमध्ये पावसाचा अंदाज असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पाऊस होईल. मुंबईसह उपनगरांमध्येही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. हेच नाही तर पुढील दोन ते तीन दिवस पावसाचे ढग राज्यावर असण्याचे संकेत आहेत. फक्त महाराष्ट्राच नाही तर देशाच्या विविध ठिकाणी पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. पंजाबमध्ये पावसाचा कहर बघायला मिळाला. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली.

राज्यात देखील सततच्या पावसामुळे शेतींचे मोठे नुकसान झालंय. जालना शहरात दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागाला मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने त्यांच्या जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले.अजूनही शहरातील काही भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी वेळ लागत आहे. जालन्यात दोन दिवसांपूर्वी अतिमुसळधार पाऊस झाला.

जालना जिल्ह्याला 19 सप्टेंबरपर्यंत देण्यात आला येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.  मुक्ताईनगर तालुक्यात 7 हजार हेक्टरपेक्षा जास्त शेतीपिकांचे नुकसान झाले. 35 गावांमध्ये मोठे नुकसान पावसामुळे झाले. केळी, कापूस, सोयाबीन व मका पिके पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. उमरगा तालुक्यातील कदेर परिसरात पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. सततच्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे.

नांदेडमध्ये गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गोदावरी नदीचे पाणी नांदेड शहरातील काही घरांमध्ये घुसले. वसरणी भागातील पंचवटी नगरात गोदावरी नदीच्या पुराचे पाणी शिरले. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आठ जणांचे बोटीद्वारे रेस्क्यू करण्यात आले. विष्णुपुरी धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आलाय. विष्णुपुरी धरणातून 1 लाख 62 हजार क्युसेक वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू.