
देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी मंगळवारी (९ सप्टेंबर) रोजी मतदान पार पडलं. यावेळी देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून सीपी राधाकृष्णन यांची निवड करण्यात आली. यावेळी सी.पी. राधाकृष्णन यांना 452 तर विरोधी पक्षाचे बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली. तर 15 मतं अवैध ठरली. त्यामुळे सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. आता या निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली आहे.
श्रीकांत शिंदे यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरुन विरोधकांवर टीका करत भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए (NDA)सरकारवर विश्वास हाच अंतरात्म्याचा आवाज हे विरोधकांना उशीरा का होईना कळू लागलंय. देर आये दुरूस्त आये, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
अंतरात्म्याचा आवाज ऐकू आला का? भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीत अंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान करा, असं आवाहन काँग्रेसचे यात्रेकरु खासदार राहुल गांधीं यांनी केलं होतं. ‘इंडि’(INDI) आघाडीच्या खासदारांनी खरोखरच त्यांचं ऐकलं! अंतरात्म्याच्या आवाजाला जागून त्यांच्यापैकीच अनेकांनी आपलं पहिल्या पसंतीचं मत आदरणीय श्री. राधाकृष्णनजींच्याच पारड्यात टाकलं.
पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील एनडीए (NDA)सरकारवर विश्वास हाच अंतरात्म्याचा आवाज हे विरोधकांना उशीरा का होईना कळू लागलंय. देर आये दुरूस्त आये .. भारताच्या उपराष्ट्रपतीपदी १५२ एवढ्या प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले एनडीएचे उमेदवार आदरणीय श्री. सी. पी. राधाकृष्णनजी यांचे हार्दिक अभिनंदन आणि एनडीएला(NDA) मतदान करणाऱ्या इंडी(INDI) अलायन्सच्या खासदारांचे मनापासून धन्यवाद ! जय हिंद, जय महाराष्ट्र, असे श्रीकांत शिंदेंनी म्हटले आहे.
अंतरात्म्याचा आवाज ऐकू आला का? :
भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीत अंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान करा, असं आवाहन काँग्रेसचे यात्रेकरु खासदार राहुल गांधीं यांनी केलं होतं. ‘इंडि’(INDI) आघाडीच्या खासदारांनी खरोखरच त्यांचं ऐकलं! अंतरात्म्याच्या आवाजाला जागून त्यांच्यापैकीच…
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) September 10, 2025
दरम्यान भारताचे नवे उपराष्ट्रपती सी. पी राधाकृष्णन हे तामिळनाडूच्या गौंडर या प्रमुख ओबीसी जातीचे आहेत. त्यांची पार्श्वभूमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) शी संबंधित आहे. 2023 मध्ये राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर जुलै 2024 मध्ये त्यांची महाराष्ट्रात बदली करण्यात आली. त्यांच्या आधीच्या उपराष्ट्रपती धनखड यांच्या उलट, राधाकृष्णन यांनी राज्यपाल म्हणून वादग्रस्त राजकीय मुद्द्यांवर सार्वजनिकरित्या टिप्पणी करणे टाळले आहे. ते 1998 मध्ये पहिल्यांदा कोईम्बतूरमधून लोकसभेवर निवडून आले. यानंतर 1999 मध्ये पुन्हा याच जागेवरून ते लोकसभेवर निवडून आले.