सिझेरियन झालेल्या 14 महिलांना एकाचवेळी इन्फेक्शन, यवतमाळमध्ये खळबळ

यवतमाळ : यवतमाळ  येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात सिझेरियनने प्रसूत झालेल्या डझनावर महिलांना इन्फेक्शन झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. परिणामी गेल्या महिनाभरापासून या महिलांना नवजात बाळांसह रुग्णालयातच उपचार घ्यावे लागत आहेत. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागात 21 एप्रिल रोजी सिझेरियन झालेल्या महिलांनी शस्त्रक्रियेच्या ठिकाणी प्रचंड दुखत असल्याची तक्रार केली. परंतु थोडी कळ सोसा, …

सिझेरियन झालेल्या 14 महिलांना एकाचवेळी इन्फेक्शन, यवतमाळमध्ये खळबळ

यवतमाळ : यवतमाळ  येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात सिझेरियनने प्रसूत झालेल्या डझनावर महिलांना इन्फेक्शन झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. परिणामी गेल्या महिनाभरापासून या महिलांना नवजात बाळांसह रुग्णालयातच उपचार घ्यावे लागत आहेत.

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागात 21 एप्रिल रोजी सिझेरियन झालेल्या महिलांनी शस्त्रक्रियेच्या ठिकाणी प्रचंड दुखत असल्याची तक्रार केली. परंतु थोडी कळ सोसा, असे सांगत त्यांना अंधारात ठेवण्यात आले. एवढे दिवस कसले उपचार सुरू आहेत, याबद्दल महिलांच्या नातेवाईकांनी चौकशी केल्यावर प्रकरणाचा भांडाफोड झाला. याबाबत जास्त कुरबूर केल्यास थेट धमकावले जाते, असा आरोप प्रसूत महिलांच्या नातेवाईकांनी केला आहे.

प्रसूती झालेल्या महिलांना टाक्यांमध्ये (टिचेस) इन्फेक्शन झाले असल्याची बाब पुढे आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना इन्फेक्शन झाल्याने रुग्णालयातील हलगर्जीपणा पुढे आला आहे. या विभागातील एकूण 14 महिलांना अशाच प्रकारचे इन्फेक्शन  झाल्याची माहिती आहे.

पुसद तालुक्यातील ज्ञानेश्वर पैठणकर यांच्या पत्नीला बाळंतपणासाठी दाखल केले. त्याचे 21 एप्रिलला त्याचे सीझर करण्यात आले. मात्र त्यानंतर 4 ते 5 दिवसांनंतर सुट्टी मागितली असता टाके ओले असल्याचे कारण सांगून थांबविण्यात आले. मात्र रुग्णाला सीझर केलेल्या ठिकाणी टाक्यांमधून रक्तस्राव होत होता. शिवाय वेदना सुद्धा होत होत्या. याबाबत संबंधित विभाग प्रमुखाला सांगितले असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन उपचार सुरु असल्याचे सांगतले. 8 मेपर्यंत डॉक्टरांनी हीच उत्तरं दिली. त्यानंतर 9 मे रोजी बधीर न करता पुन्हा नव्याने टाके मारण्यात आले आणि रुग्णाला तडफडत ठेवले असल्याचा आरोप सुद्धा नातेवाईकांनी केला आहे.

धामणगाव तालुक्यातील तळेगाव दसासर येथील श्रीकृष्ण बोंद्रे यांच्या बहिणीला सुद्धा अशाच प्रकारे प्रसूतीसाठी आण्यात आले आणि तिला सीझरनंतर इन्फेक्शन झाल्याचे पुढे आले आहे. ती सुद्धा गेल्या महिन्याभरापासून रुग्णालयाच्या खाटेवर आहे. रुग्णालयातील प्रसूती विभागात  इन्फेक्शन झालेल्या प्रसूत महिला आणि त्यांचे नातेवाईक प्रचंड दडपणात असल्याचे आढळून आले. त्यांना या घटनेची वाच्यता करण्यास दबाव आणण्यात आलं असल्याचे समोर आले आहे.

रुग्णालयातील हलगर्जीपणा कळताच याबाबत माहिती घेण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना रुग्णालयात कॅमेरा घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला. शिवाय रुग्णाच्या नातेवाईकांसोबत बोलण्यास मनाई करण्यात आली. याबाबत रुणालयातील प्रभारी अधिष्ठाता डॉ भारती  यांनी इन्फेक्शनबाबत आम्हला मौखिक तक्रारी प्राप्त झाल्या असून यावरुन 5 सदस्यीय  इन्फेक्शन कन्ट्रोल कमिटीमार्फत चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कारवाई करण्याचे शासकीय उत्तर दिले.

यवतमाळचे जिल्हा शासकीय रुग्णालय ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आशास्थान आहे. ग्रामीण भागातून रुग्णाची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे प्रसूतीसाठी रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे  शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांमध्ये विशेष काळजी घेण्यात येत नसल्याने  इन्फेक्शनमध्ये वाढ झाली आहे. तसेच शस्त्रक्रिया करतेवेळी योग्यती काळजी घेण्यात येत नसल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

या संपूर्ण गंभीर प्रकरणावर रुग्णालयातील डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीकडून या प्रकरणी काय कारवाई होते की दोषी डॉक्टरांना वाचवले जाते हे पाहणं  महत्वाचे आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *