
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा देखील विरून गेला. त्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून असलेला पावसाचा जोर ओसरला आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकण-गोवा आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुढील दोन ते तीन दिवस विदर्भातील काही जिल्हे वगळता अन्यत्र पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज आहे.
येत्या ४८ तासांत कोकण, गोवा, विदर्भात बऱ्याच तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील. १२ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील घाट विभागात पावसाच्या मध्यम सरी पडतील. जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर येथील तुरळक ठिकाणी आणि विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाच्या मध्यम सरी पडतील. राज्यात १५ जुलैपर्यंत पावसाचा जोर कमी असणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.
मुंबईत शनिवारी सकाळी ढगाळ वातावरण आहे. मुंबई उपनगरात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. मुंबईत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे. पुणे शहरात शनिवारी कुठे पाऊस नव्हता. पुण्यात पाऊस ब्रेक घेणार आहे. जून महिन्यात पुण्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. यामुळे धरणांमध्ये चांगलाच जलसाठा आहे. पुण्याच्या खेड तालुक्यात झालेल्या पावसामुळे आंबेगाव आणि खेड तालुक्याला वरदान असलेला इंदिरा पाझर तलाव 100 टक्के भरला आहे.
Thunderstorm accompanied with lightning ,gusty winds reaching 30 to 40 kmph and Light to Moderate rainfall very likely to occur at isolated places in the districts of Marathwada.
Heavy rainfall very likely to occur at isolated places in ghat areas of North Madhya Maharashtra. pic.twitter.com/hamWLi3Um3— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 11, 2025
नाशिकमध्ये जून, जुलै महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. अंबिका नदीच्या उपनद्या भरुन वाहत आहे. गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावण्याने नदीच्या पातळीवर वाढ झाली आहे. या पावसामुळे गिरणा धरणातील जलसाठा वाढला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील कळवण, मालेगाव, देवळा, सटाणा, नांदगावसह जळगाव जिल्ह्यात सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.