खड्ड्यांच्या मुद्द्यावरून नाशिककर बेजार, मुख्यमंत्री येणार चित्रच पालटलं, पण…

नाशिक शहरात झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे, त्यामुळे नाशिककर खड्डेमुक्त रस्त्याच्या अपेक्षा करत असतांना पुरते बेजार झाले आहे.

खड्ड्यांच्या मुद्द्यावरून नाशिककर बेजार, मुख्यमंत्री येणार चित्रच पालटलं, पण...
Image Credit source: Google
| Updated on: Nov 15, 2022 | 4:18 PM

नाशिक : पाऊस उघडल्यानंतर नाशिक शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त व्हायला हवेत, दर्जेदार काम व्हायला हवीत अन्यथा काळ्या यादीत टाकू असा इशारा नाशिक महानगर पालिकेच्या आयुक्तांनी रस्त्याच्या कंत्राटदारांना दिला होता. मात्र, यावर पंधरा दिवस उलटूनही रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीत, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी तक्रारी करूनही रस्ते खड्डेमुक्त होत नसल्याने नाशिककर पुरते बेजार झाले आहेत. असे असतांना आदिवासी विभागाच्या एका सांस्कृतिक कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा प्रशासनाला कळताच मुख्यमंत्री ज्या रस्त्याने जाणार आहेत तेथील खड्डे बुजवण्यात आले आहेत. नाशिक महानगर पालिकेच्या बांधकाम विभागाच्या प्रशासनाने याबाबत पुढाकार घेत रातोरात हे खड्डे बुजवले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी खड्डेमुक्त रस्ता उपलब्ध ठेवला आहे.

नाशिक शहरात झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे, त्यामुळे नाशिककर खड्डेमुक्त रस्त्याच्या अपेक्षा करत असतांना पुरते बेजार झाले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त आणि गुणवत्तापूर्ण असावेत या अटी शर्तीवर रस्त्याची कंत्राटे देण्यात आली होती.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सुचनेनुसार सहाही विभागात रस्ते दुरुस्तीची कामे सुरु आहेत. ही कामे उत्कृष्ट दर्जाची असावीत, अशी स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.

मात्र, मुदत देऊनही कामे पूर्ण झालेली नाहीत, आयुक्तांच्या आदेशाला कंत्राटदारांनी केराची टोपली दाखवली असून मुख्यमंत्री येणार असल्याने त्यांच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी रात्रीचे कामे करण्यात आली आहे.

एकूणच सर्वसामान्य नागरिक खड्डेमुक्त रस्त्याची मागणी करत असतांना त्यांच्या मागणीला प्रशासन केराची टोपली दाखवत आहे, आणि दुसरीकडे मुख्यमंत्री येणार असल्याने सगळं आलबेल आहे असं दाखवण्यासाठी रात्रीतून रस्त्याची कामे करण्यात आली आहे.

दरम्यान, महापलिकेच्या कामाबाबत आणि रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ह्या बाबी निदर्शनास आणून देणे महत्वाचे आहे.

Follow Us