विश्वास नांगरे पाटलांकडून आरएसएसचं कौतुक, त्या भाषणावर पहिल्यांदाच थेट बोलले, म्हणाले रमजान, बौद्ध, ख्रिश्चन…
काही दिवसांपूर्वी आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी आरएसएसचं कौतुक केलं होतं. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता, त्यावर आता नांगरे पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे.

नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी एका सकल हिंदू समाजाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत, राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचं कौतुक केलं होतं. त्यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आली होती, तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत विश्वास नांगरे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला होता. दरम्यान त्यानंतर आता या कार्यक्रमासंदर्भात बोलताना विश्वास नांगरे पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे,
नेमकं काय म्हणाले नांगरे पाटील?
हा कार्यक्रम 19 एप्रिलला झाला, सांनपाडामध्ये हा कार्यक्रम झाला, ज्यांचे निमंत्रण मला प्रथितयश लोकांनी दिलं होतं. त्याचं निमंत्रण माझ्याकडे अजूनही आहे. मी रमजान, बौद्ध, ख्रिश्चन यांच्या कार्यक्रममध्ये नियमित जातो, हा कार्यक्रम माझ्या ऑफिस नंतर 8:30 वाजता होता. मी तिथे उपनिषदमधील एक मंत्र सांगितला, प्रेम सेवा ही आपली संस्कृती आहे. मी त्या भाषणात ज्ञानेश्वरीवर पण सविस्तर बोललो, ड्रग्सवर पण बोललो हा रचनात्मक चांगला कार्यक्रम होता. वंदे भारत आणि संघाचे शताब्दी वर्ष यावर देखील बोललो. मी कुठलाही नियमांचा भंग केलेला नाही, मी जे काही बोललो ते कायद्याच्या चौकटीत बोललो, असा खुलासा या कार्यक्रमावर विश्वास नांगरे पाटील यांनी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की मी संत्रा नगरीमध्ये पहिल्यांदाच काम करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास टाकला, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणार आहे, युवक, महिला, जेष्ठ नागरिक यांच्या प्रश्नांसाठी प्राधान्य क्रम असेल. प्रोफेशनल आणि कोअर पोलिसिंगला प्राधान्य देऊ, लोकांना सोबत घेऊन टीम म्हणून काम करण्याचा प्रयत्न असेल. आमच्या खांद्यावर आयपीएस लिहिलं आहे, त्याचा अर्थ लोकांना सेवा देणं, घाबरायचं असेल तर गुन्हेगारांनी घाबराव जनतेला घाबरण्याची गरज नाही. आम्हाला सर्वांचा आदर आणि सन्मान आहे, माझी कटिबध्दता संविधानाशी आहे. सामाजिक सांस्कृतिक संघटना यांच्या कार्यक्रमामध्ये जाणं तिथे मार्गदर्शन करणं, प्रभोधन करणं हे आमचं कर्तव्य आहे, असं यावेळी नांगरे पाटील यांनी म्हटलं आहे.