कुर्ला येथे भाऊबिजेला भरदुपारी धाड..धाड गोळ्या सुटल्या, ४० वर्षीय व्यक्तीची हत्या, काय घडले नेमके ?
एकीकडे दिवाळी आणि भाऊबिजेचा सण साजरा होत असताना कुर्ला परिसरात भरदुपारी मोटारसायकलवरुन आलेल्या हल्लेखोरांनी धाड..धाड गोळ्या झाडत एका ४० वर्षीय व्यक्ती हत्या केल्याची घटना घडली आहे.

ऐनदिवाळीत कुर्ला भागात भरदिवसा एका युवकाची गोळ्या झाडून हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. ही हत्या पूर्व वैमनस्यातून झाल्याचे म्हटले जात आहे. हत्या झालेल्या कुटुंबातील व्यक्तीची सहा महिन्यातील दुसरी हत्या असल्याने या कुटुंबाने विनोबा भावे पोलिस स्टेशन समोर यावेळी ठिय्या आंदोलन केले.तसेच संशयित आरोपीला चोप देण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी १२ टीम स्थापन केल्या आहेत. पुढील तपास आता सुरु करण्यात आला आहे.
कुर्ला येथील हलावपूल जवळ विनोद मल्लप्पा पवार (४०) याच्यावर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. सहाच महिन्यांपूर्वी विनोद याचा मोठा भाऊ बाबा पवार याची देखील अशाच प्रकारे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यासमोर पवार कुटुंबाने ठिय्या आंदोलन केले. कुर्ल्याच्या माकडवाला कंपाउंडमध्ये हे पवार कुटुंब राहते. त्यांच्याच कुटुंबात दोन गट असून त्यांच्यात वर्चस्वाची लढाई अनेक वर्षांपासून सुरू आहे. याच वादातून सहा महिन्यांपूर्वी बाबा पवार याची गोळ्या घालून दुसऱ्या गटाने हत्या केली होती.
आज दुपारी बाबा पवारचा भाऊ विनोद पवार हा हलाव पूल येथील शौचालयाजवळ आला असता, बाईकवरून आलेल्या दोघा जणांनी त्याच्या तीन राऊंड गोळ्या झाडल्या. जखमी अवस्थेत त्याला कुर्ला येथील पालिकेच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, उपायुक्त गणेश शिंदे आणि विविध विभागाचे पोलीस अधिकारी दाखल झाले. फॉरेन्सिक टीमने देखील घटनास्थळी दाखल होत पुरावे गोळा केले.
पवार कुटुंबीयांतील ही सहा महिन्यात दुसरी हत्या आहे आणि आपल्याला न्याय द्यावा या मागणीसाठी पवार कुटुंबियांनी पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केले. त्यातच संशयित आरोपी पोलिस ठाण्यात आणले असता पवार कुटुंबियांनी त्याला चोप देण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे त्यांची पोलिसांबरोबर बाचाबाची झाली. आम्हाला न्याय पाहिजे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही असा पवित्रा पवार कुटुंबियांनी यावेळी घेतला होता.
तब्बल १२ पथके तयार
पोलिसांची तब्बल १२ पथके तयार करण्यात आली असून रात्री उशीरापर्यंत यातील आरोपी फरार होते. या प्रकरणाचा तपास विनोबा भावेनगर पोलीस करीत असून पूर्व वैमन्यस्यातूनच ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर एका इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आहे अशी माहिती पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.
दोन्ही गटाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी वृत्तीची आहे.मयत विनोद पवार याच्यावर या आधीच हत्येचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या हत्येचे कारण काय? यात कोण सामील आहे?.या सर्व प्रश्नांची उत्तरे अजूनही गुलदस्त्यात आहेत… आता पोलीस कशा प्रकारे कारवाई याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
