राजकारणात लवकरच भूकंप होणार? सप्टेंबरमध्ये काय घडणार, संजय राऊतांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राऊत यांनी सप्टेंबरमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींचा अंदाज वर्तवला आहे. धनखड यांच्या राजीनाम्यामागील कारणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

राजकारणात लवकरच भूकंप होणार? सप्टेंबरमध्ये काय घडणार, संजय राऊतांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
sanjay raut
| Updated on: Jul 22, 2025 | 12:41 PM

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी वैद्यकीय कारणामुळे राजीनामा दिला आहे. ‘प्रकृतीला प्राधान्य देण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत मी संविधानाच्या कलम 67(अ) नुसार तात्काळ भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे.’ असे कारण देत त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले. आता यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी राज्याच्या राजकारणाबद्दल मोठा गौप्यस्फोट केला. येत्या सप्टेंबर महिन्यात काहीतरी मोठं घडणार आहे, असे संजय राऊत म्हणाले. मी याबद्दल जास्त काही बोलू शकत नाही. पण पडद्याच्या मागे काही तरी मोठे राजकारण सुरु आहेत. दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात पडद्याच्या मागे काही अशा गोष्टी होत आहेत, त्या लवकरच समोर येतील, असे संजय राऊत म्हणाले.

उपराष्ट्रपतींनी ज्या प्रकारे राजीनामा दिला आहे ती काही साधारण घटना नाही, असे मला वाटतं. त्यांनी जे तब्येतीचे कारण दिले आहे, ते मला मान्य नाही. ते अतिशय स्वस्थ आणि आनंदी राहणारे व्यक्ती आहेत. ते अशाप्रकारे मैदान सोडून जाणारे व्यक्ती नाहीत. आमचे त्यांच्यासोबत मतभेद असू शकतात, पण ते सहजरित्या मैदान सोडणारे व्यक्ती नाहीत. ते लढणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहेत. ते एकदम ठणठणीत आहेत. मी दिवसभर त्यांना पाहिलं आहे, त्यांची तब्येत अतिशय चांगली आहे, असेही संजय राऊतांनी सांगितले.

मी याबद्दल जास्त काही बोलू शकत नाही. पण पडद्याच्या मागे काही तरी मोठे राजकारण सुरु आहेत. दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात पडद्याच्या मागे काही अशा गोष्टी होत आहेत, त्या लवकरच समोर येतील. काही ना काही होत आहे, याबद्दल लवकरच आपल्याला समजेल. सप्टेंबर महिन्यात नक्कीच काहीतरी होईल. भाजप देशात विरोधकांना ठेवू इच्छित नाही. नक्कीच सप्टेंबर महिन्यात काहीतरी होणार, हे लक्षात ठेवा, असेही संजय राऊतांनी म्हटले.