गणपती विसर्जन सुरू होतं… अचानक पिता-पुत्र खदानीत बुडाले; पालिका पथक धावून आलं अन् पुढच्याच क्षणी…
Jalgaon News: गणेश विसर्जनादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. अमळनेरमध्ये गणेश विसर्जनाच्यावेळी पिता-पुत्र खदानीत बुडाल्याची घटना समोर आली आहे.

महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. अशातच जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगावच्या अमळनेरमध्ये गणेश विसर्जनाच्या वेळी पिता-पुत्र खदानीत बुडाल्याची घटना घडली. सुदैवाने त्यांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे गावात खळबळ पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
जळगावच्या अमळनेरमध्ये गणेश विसर्जनाच्या वेळी पिता-पुत्र खदानीत बुडाले. यानंतर सतर्क असलेल्या नगरपालिकेच्या पथकाने वेळीच उपाययोजना करत दोघांचेही प्राण वाचवले. देवळी खदानीत गणपती विसर्जन करताना ही घटना घटल्याचे दिसून आले आहे. नवव्या दिवसाचे गणपतीचे विसर्जनादरम्यान पिता-पुत्राचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले.
गणपती विसर्जनावेळी १० वर्षीय मुलाने वडिलांचा हात पकडला होता. यामुळे वडिलांचा पाय घसरल्यानंतर दोघेही पाण्यात बुडाले. ही घटना दिसून येताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या अमळनेर नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने हालचाली सुरू केल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पथकाने क्षणाचाही विलंब न करता दोघांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी बचावकार्य केले.
अथक प्रयत्नांनंतर पिता-पुत्राला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. नगरपालिकेच्या पथकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. वेळेत मदत मिळाल्याने पिता-पुत्राचे प्राण वाचले. या बचावकार्यात स्वच्छता निरीक्षक संतोष माणिक आणि मुकादम गोल्डी बिऱ्हाडे यांनी दाखवलेल्या धाडसाचे विशेष कौतुक होत आहे.
या घटनेनंतर गणेश विसर्जनाच्या वेळी नागरिकांनी खदानी, तलाव किंवा खोल पाण्यात उतरताना विशेष काळजी घेण्याची गरज या घटनेतून पुन्हा निर्माण झाली आहे. प्रशासनाकडूनही विसर्जनाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या घटनेनंतर स्वच्छता निरीक्षक संतोष माणिक आणि मुकादम गोल्डी बिऱ्हाडे यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.