‘शरद पवार यांचा शिवसेना संपवण्याचा कट, उद्धव ठाकरे ट्रॅपमध्ये अडकले’, भाजपच्या बड्या नेत्याचे धक्कादायक दावे

भाजपच्या बड्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याबद्दल धक्कादायक विधान केलंय.

शरद पवार यांचा शिवसेना संपवण्याचा कट, उद्धव ठाकरे ट्रॅपमध्ये अडकले, भाजपच्या बड्या नेत्याचे धक्कादायक दावे
| Edited By: | Updated on: Nov 20, 2022 | 7:40 PM

जळगाव : शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कट-कारस्थान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. “भविष्यात शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आणखी दोन लोक एवढेच दिसतील. सेना ही संपूर्ण खाली झालेली दिसेल”, असाही धक्कादायक दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.

चंद्रशेखर बावनकुळे हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल धक्कादायक दावे केले.

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण विचारांना विसरून उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस समोर लोटांगण घालत आहेत”, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

“शिवसेना संपविण्यासाठी शरद पवार यांनी जो ट्रॅप टाकला आहे त्या ट्रॅपमध्ये उद्धव ठाकरे हे दिवसेंदिवस अडकत जात आहेत. यात ते फसत जात आहेत आणि यामुळेच भविष्यात पक्षाच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आणखी दोन लोक एवढेच दिसतील. सेना ही खाली झालेली दिसेल”, असाही टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

इतक्या वाईट परिस्थितीत राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्याकडून सेना संपविण्याच काम सुरू असल्याचा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केला .