काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली, थेट स्वबळावर लढण्याची तयारी, नेमकं काय घडतंय?

राज्यात लोकसभेत महाविकास आघाडीला मोठं यश मिळाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह वाढला आहे. विधानसभेसाठी इच्छुकांनी जळगावच्या काँग्रेस भवन कार्यालयात आजपासून अहवाल सादर करण्यास सुरुवात केली आहे.

काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली, थेट स्वबळावर लढण्याची तयारी, नेमकं काय घडतंय?
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jun 20, 2024 | 8:17 PM

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश आलं. विशेष म्हणजे काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेसला महाराष्ट्रात एकूण 13 जागांवर यश आलं. त्यापाठोपाठ ठाकरे गटाला 9 जागांवर यश आलं. तर शरद पवार गटाला 8 जागांवर यश मिळालं. यानंतर आता काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली घडत असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या सर्व 11 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षातर्फे जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. पाहिजे तशा जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीसोबत, अन्यथा पक्षाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व 11 विधानसभा मतदारसंघाच्या जागा काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसचे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार यांनी याबाबत माहिती दिली.

राज्यात लोकसभेत महाविकास आघाडीला मोठं यश मिळाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह वाढला आहे. विधानसभेसाठी इच्छुकांनी जळगावच्या काँग्रेस भवन कार्यालयात आजपासून अहवाल सादर करण्यास सुरुवात केली आहे. सात दिवसांच्या आत इच्छुक उमेदवारांची नावे आणि अहवाल जिल्हा कार्यालयात सादर करण्याच्या सूचना तालुका निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.

काँग्रेसला झुकतं माफ मिळावं, जिल्हाध्यक्षांची मागणी

वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची जळगावात काँग्रेस भवनमध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या. महाविकास आघाडीसोबत घेऊन निवडणूक लढवण्याचा धोरण ठरलं तर विधानसभेच्या जागावाटपात काँग्रेसला झुकतं माफ मिळावं, अशी अपेक्षा जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केली.

सात दिवसांच्या आत इच्छुक उमेदवारांची नावे सादर करण्याचे आदेश

महाविकास आघाडीत जो निर्णय होईल तो होईल. पण आपली स्वतःची तयारी असावी म्हणून काँग्रेस पक्षाने जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. सात दिवसांच्या आत इच्छुक उमेदवारांची नावे आणि अहवाल जिल्हा कार्यालयात सादर करावा, अशा सूचना तालुका निरीक्षकांना देण्यात आलेल्या आहेत. आघाडी झाली तर जे मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येतील तिथे ताकद वाढविणे आणि आघाडी नाही झाली तर सर्व 11 मतदारसंघात उमेदवार उभे करायचे, असे पक्षाचे धोरण ठरले आहे. त्यानुसार ही तातडीची बैठक घेण्यात आली.

सर्व निरीक्षक आणि अध्यक्षांना मतदार याद्या, नमुना फॉर्म देण्यात आले. विधानसभा निवडणुकीत निरीक्षकांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. काँग्रेसने जळगाव जिल्ह्यात सर्व 11 विधानसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.