‘आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आलो’, बंडखोरीबद्दल गुलाबराव पाटील यांचा धक्कादायक दावा

| Updated on: Nov 19, 2022 | 6:35 PM

शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी धक्कादायक विधान केलंय.

आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आलो, बंडखोरीबद्दल गुलाबराव पाटील यांचा धक्कादायक दावा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात साडेतीन महिन्यांपूर्वी फार मोठा भूकंप आला होता. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष अशी ख्याती असलेल्या शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. शिवसेना पक्षातील नंबर दोनचे नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केली होती. त्यांना अपक्ष आणि इतर मित्र पक्षाच्या आणखी 10 आमदारांनी साथ दिली होती. त्यामुळे तब्बल 50 आमदारांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील पाठिंबा काढला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या बंडखोरीबद्दल शिंदे गटाचे नेते आपण पक्ष नेतृत्वाविरोधात उठाव केल्याचं म्हणतात. विशेष म्हणजे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आतादेखील महत्त्वाचं विधान केलंय.

“आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आलो. साधं सरपंचपद कोणी सोडत नाही. आम्ही 8 जणांनी मंत्रीपद सोडून दिलं होतं. आमची संख्या पूर्ण झाली नसती तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली राहिली असती”, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.

“उठावासाठी 38 आमदार लागणार होते. मी 33 वा होतो, 5 आमदार आले नसते तर माझा कार्यक्रम आटोपला असता”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे सचिव, खासदार संजय राऊत यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला. “उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला ‘दिखते हो शेर जैसे लगते हो चुहे जैसे’ असं म्हणून आम्हाला डिवचलं”, असं देखील गुलाबराव म्हणाले.

“असं मरण्यापेक्षा शहीद झालो तरी चालेल अशी खून गाठ डोक्यात बांधत आम्ही बाहेर पडलो होतो”, असंदेखील विधान त्यांनी केलं.

दरम्यान, महाराष्ट्रात सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचं सरकार आहे. सरकार स्थापन होऊन आता जवळपास चार महिने होत आहेत. पण तरीही राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झालेला नाही. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून तर राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.