“खडसेंना म्हणावं तुमची वायफळ बडबड बंद करा”; भाजप नेत्याने एकनाथ खडसे यांना सुनावलं…

| Updated on: Jun 01, 2023 | 4:38 PM

खडसेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या कापसाच्या आंदोलनाला 200 लोकं नव्हती. मी कापसाला भाव मिळावा म्हणून आंदोलन केलं तेव्हा 15 हजार लोकं उपस्थित होते.

खडसेंना म्हणावं तुमची वायफळ बडबड बंद करा; भाजप नेत्याने एकनाथ खडसे यांना सुनावलं...
Follow us on

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद महाराष्ट्राला नवीन नाहीत. मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून या दोघांमधील वाद प्रचंड वाढले आहेत. एकमेकांवर आरोप करत खडसे आणि महाजन यांच्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दोन दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर आज पुन्हा गिरीश महाजन यांनी त्यांची इभ्रत काढत तुमच्या वयाला शोभत नाही अशी टीका करत तुम्ही करत असलेली वायफळ बडबड बंद करावी असा टोलाही खडसे यांना लगावण्यात आला आहे.

मागील दोन दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांचे डोकं तपासावे लागणार असा घणाघात त्यांनी त्यांच्यावर केला होता.

त्यानंतर एकनाथ खडसे यांनीही मला तोंड उघडायला लावू नका असा थेट इशाराच गिरीश महाजन यांना दिला होता. तर त्यानंतर आता पुन्हा एकदा गिरीश महाजन यांनी एकनात खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

तुमच्यासारखी भाषा जमत नाही

त्यांच्यावर टीका करताना त्यांच्या भाषेचा उल्लेख करत तुम्हाला ती भाषा शोभत नाही असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी त्यांच्या वयाचा उल्लेख करत तुमच्यासारखी आपल्याला भाषा जमत नाही आमच्या पक्षीय बंधने आहेत असं सांगत त्यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.

वायफळ बडबड बंद करा

गिरीश महाजन यांनी म्हटले आहे की, एकनाथ खडसे यांना म्हणावं तुमची वायफळ बडबड बंद करावी. ही बडबड तुमच्या वयाला आणि इभ्रतीला शोभत नाही. ही असंसदीय भाषा आम्हालाही बोलता येत नाही. तसेच आमच्यावर पक्षीय बंधने आहेत म्हणून तुम्ही ज्या पातळीवर टीका करता त्याप्रकारची टीका आम्हाला करता येत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

सरकारचं डोकं ठिकाणावर 

एकनाथ खडसे वारंवार सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा सवाल करतात. त्यावर बोलताना महाजन यांनी सांगितले की, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे, कामंही सरकारची जोमानं सुरू आहेत अशा भाषेत राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना सुनावले आहे.

विरोधकांना हे दिसलं नाही

खडसेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या कापसाच्या आंदोलनाला 200 लोकं नव्हती. मी कापसाला भाव मिळावा म्हणून आंदोलन केलं तेव्हा 15 हजार लोकं उपस्थित होते. आम्ही कापसाला 12 हजार भाव दिला तेव्हा विरोधकांना हे दिसलं नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.