जरांगे पाटलांना मोठं केलं, आता बाजूला का करता? चंद्रकांत खैरे यांचा थेट सवाल, श्रीकांत शिंदे यांच्या चौकशीची मागणी
Chandrakant Khaire on Shrikant Shinde: शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे भाजप आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहे. त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

Chandrakant Khaire on Manoj Jarange: मराठा आंदोलनानंतर आता 500 कोटींचा मुद्दा तापला आहे. आपल्या नावावर हे 500 कोटी रुपये घेतल्याचा ऑडिओ बॉम्ब मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी टाकला. त्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत चकमक उडाली. तर सरकारने या ऑडिओ क्लिपची वैधता, त्याची सत्यता तपासण्याचे जाहीर केले आहे. त्याचवेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे भाजप आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहे. त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या चौकशीची मागणी केली आहे. जळगावमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांनी ही मागणी केली.
जरांगे पाटलांना मोठं केलं, आता बाजूला का करता?
जरांगे पाटील यांना मोठं केलं, आता त्यांना बाजूला का करता? असा रोकडा सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला. जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांचं नाव असल्याने सरकारने निर्णय घ्यावा असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे सेनेवर सडकून टीका केली. त्यांनी याप्रकरणात सत्य बाहेर आणण्याची मागणी केली.
श्रीकांत शिंदे यांच्या चौकशीची मागणी
500 कोटींच्या कथित व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या भूमिकेच्या चौकशीची मागणी त्यांनी केली. शेतकरी प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा आरोप त्यांनी केला. अमित शाह यांच्या आशीर्वादाने राजकारण सुरू असल्याचा दावा सुद्धा खैरे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही गंभीर आरोप केले. जळगावमध्ये एका कार्यक्रमानिमित्त ते आले होते.
मंगेश ससाणे यांचा मोठा सवाल
मनोज जरांगे यांनी समोर आणलेली ऑडिओ क्लिप मधील 500 कोटींच्या संदर्भात ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी मोठा प्रश्न उपस्थित केला. मनोज जरांगे यांना 500 कोटी देऊन कोणी उभा केला. भुजबळ यांना शिव्या देण्यासाठी कोणी पैसे दिले??? पवारांनी की शिंदे यांनी? भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा ताई, चंद्रशेखर बावनकुळे या ओबीसी नेत्याना.कोणी टार्गेट करायला सांगितलं, असे अनेक सवाल मंगेश ससाणे यांनी उपस्थित केले आहेत. या सर्व बाबींची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील मंगेश ससाणे यांनी केली आहे.