
सुनेत्रा ताई पवार यांच्या शपथविधीचे अनेक जण भांडवल करीत आहेत. रोहित पवारांनी अजित पवारांच्या मृत्यूचे भांडवल करण्यापेक्षा त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी समोर येऊन सादर करावेत अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. तटकरे, मुंडे, भुजबळ, पटेल ही ढेकणे, झुरळे सुनेत्रा पवार यांच्याभोवती फिरताहेत अशी टीका मनोज जरांगे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना या ढेकणा, झुरळांनी केलंय काय तर अपघातात निधन झालेल्या अजित पवारांच्या पत्नीला उपमुख्यमंत्री केले आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांची मानसिकता तपासली पाहिजे अशीही टीका हाके यांनी केली आहे.
जरांगे पाटील हा शरद पवार, रोहित पवार, बजरंग सोनवणे यांची स्क्रिप्ट वापरतो. तो स्वतःच्या डोक्याने काही बोलत नाही त्यामुळे डोक्याचा भाग कमी असलेला माणूस आहे. त्याच्यावर मी जास्त काही बोलत नाही असेही लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. सुनेत्राताई पवार यांच्या शपथविधीचे अनेक जण भांडवल करत आहेत. रोहित पवार यांनी अजित पवारांच्या मृत्यूचे भांडवल करण्यापेक्षा त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी समोर येऊन सादर करावेत अशीही मागणी हाके यांनी केली आहे.
बीडच्या खासदाराने मागणी केली असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे, परंतु बजरंग सोनवणे यांनी मागणी करणे म्हणजे एक सनसनाटी ( स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी ) करण्यासाठी केलेली मागणी आहे अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. सुनेत्रा पवारांच्या शपथविधी वर कोणी कितीही टीका केली असली तरी राजकारणात टायमिंगला महत्त्व असते, जर त्यांनी हा टाइमिंग साधला नसता तर राजकारणात कुस्तीपट्टू म्हणून प्रसिद्ध असलेल्या शरद पवारांनी नक्कीच भाकरी फिरवली असती आणि सुनीत्रा ताईंवर अन्याय झाला असता, असेही मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले आहे.
सुनेत्राताई राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्याने त्यांचे स्वागतही केले आहे. अजितदादांपेक्षाही सुनेत्राताई चांगले राजकारण करतील असा ठाम विश्वास असल्याचे हाके यावेळी म्हणाले. आकड्यांचे गणित जुळलं तर शरद पवार साहेब हे राज्यसभेवर जातील, परंतु मला आकड्यांचं गणित जुळेल असे काही वाटत नाही असेही ते म्हणाले.
दिवसा ढवळ्या ओबीसीचे आरक्षण संपवण्याचं काम सरकारकडून होतं आहे. कोल्हापूर, अहिल्यानगर येथे महापौर पद देतानाही ओबीसीला डावलण्यात आले असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. पंचायत समितीच्या निवडणुकी या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. मतांचा बाजार मांडला गेला आहे, लोकशाहीचा व्यापार म्हणजे पैशाने मत विकत घेतली जात आहेत.खऱ्या अर्थाने लोकशाहीचा हा अपमान आहे, असं दुर्दैवी चित्र सध्या महाराष्ट्रात सुरू आहे, अशा भाषेत सध्याच्या परिस्थितीवर लक्ष्मण हाके यांनी बोचरी टीका केली आहे.