सरकारचे शिष्टमंडळ आणायला मी एवढा मोठा आहे का ? गंगाधर काळकुटे यांनी बारस्कर यांना सुनावले
Gangadhar Kalkute On Ajay Baraskar : उगाच खोटे नाटे आरोप करू नका, माझी ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करा आणि दोषी आढळल्यास टकमक टोकावरून ढकलून द्या किंवा भर चौकात फाशी द्या असेही गंगाधर काळकुटे यांनी म्हटले आहे

आपल्यातल्या आपल्यात वाद नको, मराठा समाजात चुकीचा मॅसेज जायला नको म्हणून आजपर्यंत अजय बारस्कर आणि अमोल खुनेंवर बोलत नव्हतो. पुरावे असतील तर त्यांनी बोलावं अन्यथा त्यांना महागात पडणार, वेळप्रसंगी त्यांना कोर्टात खेचू अशा इशारा जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी म्हटले आहे. जरांगे पाटलांच्या घातपाताच्या प्रकरणात मी तक्रार दिली म्हणून तो अडकला असा अमोल खुने याचा समज झाल्याने त्याचा माझ्यावर राग आहे असेही काळकुटे म्हणाले.
भय्यु महाराजांची दोनशे कोटींची जमीन हडपली, पुण्यात सात गुंठे जागा घेतली असे यापुर्वी माझ्यावर आरोप केले गेले. त्याचे पुरावे द्या अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असेही गंगाधर काळकुटे यांनी म्हटले आहे. उगाच खोटे आरोप करू नका, माझी ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करा आणि दोषी आढळल्यास टकमक टोकावरून ढकलून द्या किंवा भर चौकात फाशी द्या असेही काळकुटे यांनी म्हटले आहे. मी कॉन्ट्रॅक्टर आहे, पण तीन वर्षांत एकही काम केलेले नाही. मनोज दादांपासून आम्ही बाजूला होऊन दादा एकटे पडावेत असं कोणालातरी वाटतंय, असेही काळकुटे यांनी म्हटले आहे.
अमोल खुणे हा काय ईडीचा प्रवक्ता आहे का?
सरकारचे शिष्टमंडळ आणायला मी एवढा मोठा आहे का?, माझे फोन कॉल्स चेक करा. अमोल खुणे हा काय ईडीचा प्रवक्ता आहे का?, मी बीडमध्ये आहे, कधीही अटक करा. पुढच्या आठवड्यात आपण ईडीच्या कार्यालयात जाणार आहोत. संजय शिरसाट यांच्यावर आरोप करण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी पैसे दिले अशा हवेत गोळ्या मारू नका, थेट नाव घ्या कोणाकडे पैसे दिले. आमच्यातल्या आमच्यात चिखलफेक घडवून काही जणांना मजा बघायची आहे. लक्ष्मण हाके, वाघमारे आणि सदावर्तेला तरी तसेच वाटत असावे असेही काळकुठे यांनी म्हटले आहे.