Jaykumar Gore : फडणवीसांचे निकटवर्तीय जयकुमार गोरेंनी शिंदेंच्या मंत्र्याला सुनावलं, हे ठरवण्याचा अधिकार..
jaykumar gore : जयकुमार गोरे यांनी मंत्री भरत गोगावले यांना सल्ला दिला आहे. मंत्रिमंडळातील सहकारी आहोत, आपण जबाबदारीने बोलले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात शिक्षणमंत्रिपद मिळणार असल्याची जोरादार चर्चा आहे. या चर्चेदरम्यान भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असं देवाकडे साकडं घातल्याचे माध्यमांना सांगितलं. मंत्री भरत गोगावले यांच्या वक्तव्यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी भाष्य केलं. मंत्रिमंडळातील सहकारी आहोत, जबाबदारी बोललं पाहिजे, असा सल्ला मंत्री विजयकुमार गोरे यांनी गोगावले यांना दिलाय. जयकुमार गोरे यांनी सल्ला दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
सोलापुरात जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना गोरे यांनी म्हटलं की, ‘राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उत्तम कामे करतात. राज्यातील निवडणुकांमध्ये मिळालेले यश हे त्यांच्या कामाची पोचपावती आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्यात चांगले काम करत आहेत. ते महाराष्ट्रात राहतील, असं त्यांनी स्वत: सांगितलं आहे. सहकारी पक्षातील नेत्यांनी विनंती आहे की, कोण वर जाणार , कोण खाली राहील हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आपण मंत्रिमंडळातील सहकारी आहोत, सर्वांनी जबाबदारीने बोलले पाहिजे. त्यामुळे असे वक्तव्य किंवा चर्चांपासून दूर राहावं’.
शरद पवार गटावर भाष्य करताना म्हटलं की, ‘एनडीए आम्ही एकसंध आहोत. माझ्या माहितीप्रमाणे एनडीएमध्ये दुसरा पक्ष वाढतोय. पण कमी होण्याची शक्यता नाही’. तर वीज पुरवठ्यावर त्यांनी म्हटलं की, ‘उजनी लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे धरण जवळपास 97 टक्के भरलं आहे. एल निनोचं संकट असताना धरण भरलं, त्यामुळे मोठं संकट टळलं. भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे 8 तास वीजपुरवठा होणार आहे’.
जयकुमार गडकरींवर काय म्हणाले?
कथित एमपीएसी पेपरफुटीवर भाष्य करताना जयकुमार यांनी म्हटलं की, ‘माझ्या माहितीनुसार असा कुठलाही पेपर फुटलेला नाही. रोहित पवारांचे MPSC सेंटर कदाचित दुसरं असेल’. तर धाराशिव बॅनर वादावर म्हटलं की, ‘आपला जीव धाराशिव’ हे व्हिजन घेऊन झेडपीने संकल्प केला आहे. ग्रामीण भागात ग्रंथालय यासह विविध सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. कामाच्या उणीवा शोधा राजकीय उणीवा शोधू नका. शिवसेना आणि इतर पक्षाचे नेते तेथे उपस्थित होते. झेडपीने जो प्रकल्प हाती घेतला आहे, तो उत्तम आहे. यावेळी गोरे यांनी नितीन गडकरी यांच्यावरही भाष्य केलं. ‘ आज आपण आणि विरोधक चालत असलेले रस्ते गडकरी साहेबांच्या माध्यमातून झाले आहेत. मात्र सर्वोत्कृष्ट कामाला बदनाम करण्याची रीत आपल्याकडे आहे. विरोधकांनी ती रीत, ती पद्धत हातात घेतली आहे. त्यामुळे ज्या ज्या व्यवस्थेला बदनाम केले की ते ते चांगले काम मागे राहते आणि बदनामीची गोष्ट पुढे येते’.