अन् मंचावरच सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू तरळले, अजितदादांची आठवण येताच भावूक; म्हणाल्या 31 वर्षे 5 महिने…
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भरसभेत अश्रू अनावर झाले. अजितदादांच्या आठवणीने कंठ दाटून आला. पण त्यांनी स्वत:ला सावरलं आणि दादांच्या कामाचा गौरव केला.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एका विशेष कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भरसभेत अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 109वी वार्षिक सर्वसाधारण सभा भावनिक वातावरणात पार पडली. या कार्यक्रमात बोलताना सुनेत्रा पवार पती अजित पवार यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाच्या आठवणीने अत्यंत भावुक झाल्या. अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि संचालक म्हणून काम करताना बँकेला सहकार क्षेत्रात एका सर्वोच्च शिखरावर पोहोचवले. सुनेत्रा पवार यांनी पुढे सांगितले की, बँकेच्या प्रगतीमध्ये दादांनी घेतलेले कष्ट आणि शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे नेहमीच मार्गदर्शक ठरतील. सुनेत्रा पवार यांचे हे भावुक रूप पाहून सभागृहात उपस्थित असलेले बँकेचे संचालक आणि कार्यकर्तेही काही काळ स्तब्ध झाले होते.
सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, “या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या मनात अजित पवारांच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या आहेत. अजित दादांनी बँकेचे संचालक म्हणून तब्बल 32 वर्षे आणि 5 महिने जबाबदारी सांभाळली आहे. त्यांचे आणि या बँकेचे तीन दशकांचे अत्यंत अतूट असे नाते होते. त्यांच्या पहिल्या निवडणुकीपासून ते आजपर्यंतचा त्यांचा जो संपूर्ण संघर्षमय प्रवास होता, तो सगळा प्रवास आज माझ्या डोळ्यासमोरून गेला.” हे सांगताना त्यांचा आवाज दाटून आला आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा भावनिक वातावरणात पार पडली. दादांचं आणि पीडीसीसी बँकेचं तब्बल ३२ वर्षे ५ महिन्यांचं अतूट नातं होतं. या प्रदीर्घ काळात त्यांनी बँकेच्या आर्थिक शिस्तीपासून कर्जवाटप, वसुली, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि बँकेच्या भविष्यातील… pic.twitter.com/Zw2v0GaWkY
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) September 12, 2026
सुनेत्रा पवार यांनी ट्विटरवर पोस्ट करत सांगितलं की, अजितदादांनी मागील वर्षीच्या बँकेच्या सर्वसाधारण सभेसाठी स्वतःच्या हस्ताक्षरात तयार केलेल्या अभ्यासपूर्ण टिपणात शेतकरी बांधवांच्या होतकरू मुलांच्या शिक्षणासाठीच्या शैक्षणिक कर्जावरील व्याजदरात सवलत देण्याचा मुद्दा आवर्जून नमूद केला होता. त्याच अनुषंगाने देशात आणि विदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या मिळणारी व्याजदरातील 4 टक्के सवलत 1 टक्क्याने वाढवून 5 टक्के करण्याचं आवाहन बँकेला केलं.
आदरणीय दादांचा शेतकरी हिताचा विचार, सहकाराचा विश्वास आणि पीडीसीसी बँकेची ताकद या त्रिसूत्रीच्या बळावर पुणे जिल्ह्याची ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक समृद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करूया, असं आवाहन केलं, असंही त्या पुढे म्हणाल्या.
