
सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांना मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे अजित पवार (उपमुख्यमंत्री अजित पवार नव्हे) यांना दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात पाच कोटी खंडणी मागितल्याची तक्रार केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार जयकुमार गोरे यांनी ही तक्रार पत्रकार तुषार खरात यांच्याविरोधात दाखल केली होतीय. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना सीडीआरमध्ये अजित पवार यांचे कॉल डिटेल्स सापडले आहेत. त्यानंतर पोलिसांनी अजित पवार यांना ताब्यात घेतले आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. अजित पवार हे दहिवडी कॉलेजच्या महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य आहेत. विशेष म्हणजे पाणी फाउंडेशनमध्येही सक्रिय सहभाग असतो.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका महिलेचा छळ केला आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला होता. या आरोपानंतर गोरे अडचणीत आले होते. त्यानंतर गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आले होते.
जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटी रुपयांची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आले होते. साताऱ्याच्या पोलिसांनी ही कारवाई केली होती. कथितपणे छळ केल्याचे प्रकरण मिटवण्यासाठी या गोरे यांच्याकडे 3 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. यातील एक कोटी रुपये स्वीकारताना या महिलेला पोलिसांनी अटक केले होते.
याच महिलेला जयकुमार गोरे यांनी 2016 साली नग्न फोटो पाठवल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण न्यायालयात गेले होते. जिल्हा आणि मुंबई उच्च न्यायालयाने गोरे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यानंतर गोरे यांना एकूण 10 दिवस तुरुंगात काढावे लागले होते. मात्र या महिलेला जानेवारी महिन्यात एक निवावी पत्र आले होते. त्या पत्रानंतर महिलेने पुन्हा एकदा जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली होती.