काका चला पुढे…, शिट्टी वाजवली अन् ट्राफिक कंट्रोल केलं; चिमुकल्याचा Video पाहून तुम्हीही विचाराल जाब
कल्याणमधील भीषण वाहतूक कोंडीमुळे एका चिमुकल्याला रस्त्यावर उतरून ट्रॅफिक नियमन करावे लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये हा चिमुकला शिट्टी वाजवत वाहनचालकांना मार्ग दाखवताना दिसतोय,
गेल्या काही दिवसांपासून वाढत्या आणि जीवघेण्या वाहतूक कोंडीमुळे कल्याण शहर सातत्याने चर्चेत आहे. मात्र यावेळी कारण वेगळं आहे. जिथे लहान मुलांना शाळेत आणि बागेत खेळायला हवे, त्या वयात एक चिमुकला थेट शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर उतरून शिट्टी वाजवत ट्रॅफिक सुरळीत करताना पाहायला मिळत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा हा निष्पाप प्रयत्न जितका गोड आहे, तितकाच तो कल्याणच्या वाहतूक व्यवस्थेचे आणि प्रशासकीय दुर्लक्षाचे भीषण वास्तव उघड करणारा आहे.
व्हिडीओत नेमकं काय?
कल्याण शहरातील वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या एका भागात हा धक्कादायक प्रसंग घडला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या मधोमध एक लहान मुलगा उभा आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ज्यामुळे ट्रॅफिक पूर्णपणे थांबलेले आहे. हा मुलगा आपल्या हातात शिट्टी घेऊन ट्रॅफिक पोलीस प्रमाणे काम करताना दिसतो. तो मोठ्या आत्मविश्वासाने शिट्टी वाजवून वाहनचालकांना निर्देश देत असल्याचे पाहायला मिळत आहे. “काका पुढे चला,” “इकडे घ्या गाडी,” असे जोरजोरात सांगून तो अडकलेल्या वाहनांना मार्ग मोकळा करून देण्याचा प्रयत्न करत आहे.
हा हृदयस्पर्शी व्हिडीओ केवळ काही मिनिटांचा असला तरी त्याने कल्याणच्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावरुन प्रशासनावर टीकेची तीव्र झोड उठवली आहे. यामुळे कल्याणमधील अनेकजण शहरातील वाहतूक व्यवस्था इतकी कोलमडली आहे की आता लहान मुलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ यावी? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वाहनचालकांसह नागरिक हैराण
कल्याण शहरात वाहतूक कोंडी ही आता रोजची डोकेदुखी बनली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेल्या कामांमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मेट्रोचे काम, उड्डाणपुलांचे बांधकाम आणि जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे एकाच वेळी सुरू आहेत. या कामांचे नियोजन योग्य नसल्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत किंवा अनेक ठिकाणी अचानक खोदकाम केलेले आहे. हा परिसर शहरातील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी याच बैलबाजार सर्कल परिसरात जलवाहिनी फुटल्याने दुरुस्तीसाठी रस्ता तीन दिवस बंद ठेवण्यात आला होता, ज्यामुळे परिसरातील एका शाळेलाही सुट्टी जाहीर करावी लागली होती. यामुळे वाहनचालकांसह नागरिक हैराण झाले होते.
नागरिकांच्या तक्रारीनुसार, ज्या ठिकाणी सर्वात जास्त वाहतूक कोंडी होते, त्याच ठिकाणी अनेकदा वाहतूक पोलीस उपस्थित नसतात. त्यांच्या अनुपस्थितीमुळे ट्रॅफिक पूर्णपणे विस्कळीत होते आणि वाहनचालकांमध्ये वादविवाद होतात. या सततच्या कोंडीचा फटका रुग्णवाहिका, शालेय बसेस आणि वेळेवर कार्यालयात पोहोचू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. तास न् तास रांगा लावून मार्ग काढणे, हा कल्याणकरांसाठी नित्यक्रम बनला आहे. चिमुकल्याचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर कल्याणमधील नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. त्यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि वाहतूक विभागाला धारेवर धरले आहे.
वाहतूक पोलीस नेमके कुठे आहेत? एका लहानग्याला जर वाहतूक नियमन करावे लागत असेल, तर प्रशासकीय यंत्रणा काय करत आहे? विकासकामे करताना वाहतुकीचे पर्यायी नियोजन का केले जात नाही? KDMC आणि वाहतूक विभागाने एकत्र येऊन या गंभीर प्रश्नावर तातडीने आणि ठोस उपाययोजना कधी करायची? असे सवालही उपस्थित केले जात आहे.
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...

