Iran Israel War : युद्धामुळे पोरांना बायको मिळणं मुश्कील, 80 टक्के लग्न संकटात; धक्कादायक कनेक्शन समोर!
इराण इस्रायल युद्धामुळे भारतासह महाराष्ट्राला मोठा फटका बसत आहे. गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. भविष्यातही अशीच स्थिती कायम राहिल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Iran Israel War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे. महाराष्ट्रातही या युद्धाची झळ बसताना दिसतेय. राज्यात घरगुती, व्यावसायिक गॅस सिलिंडरची मोठी कमतरता भासत आहे. गॅस सिलिंडर वेळेवर भेटत नसल्याने समान्य नागरिक हवालदिल होत आहेत. विशेष म्हणजे खानावळ आणि हॉटेल व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसत आहे. आता तर ऐन लग्नसराईत गॅस टंचाई निर्माण झाल्याने लग्नच पुढे ढकलावे लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
सिलिंडरच्या कमतरतेमुळे होणार मोठी अडचण
युद्धाचा फटका लग्नसराई हॉल आणि केटरर्स यांना बसत आहे. त्याची काही उदाहरणे ठाण्यात समोर आली आहेत. ठाण्यात हॉल आणि केटरर्सचा व्यवसाय करणाऱ्यांनी या लग्नसराईत लाखो रुपयांच्या लग्नाच्या ऑर्डर घेतलेल्या आहेत. परंतु मात्र गॅस सिलिंडरच्या कमतरतेमुळे लग्नासाठीच्या हॉल व्यवसायिकांची चिंता वाढली आहे. हजारो लोकांच्या जेवणाच्या पंगतीवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. ही शक्यता खरी ठरल्यास भविष्यात विवाह असणाऱ्या कुटुंबाला लग्नाच्या हॉलसाठी आटापिटा करावा लागणार आहे.
80 टक्के हॉटेल व लग्न कार्यकांचे हॉल बंद होणार
या व्यवसायात काम करणाऱ्यांच्या मते एलपीजी गॅसच्या तुटवड्यावर वेळीच तोडगा न निघाल्यास ठाण्यातील 80 टक्के हॉटेल व लग्न कार्यकांचे हॉल येत्या रविवार पर्यंत बंद होऊ शकतात. असे प्रत्यक्षात घडले तर या हॉलमध्ये होणाऱ्या विवाहांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विवाह तर रद्द होणार नाही ना? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी ठाण्यात हॉटेल मालकांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. सरकारने यावर काहीतरी तोडगा काढावा, अशी मागणी घेऊन हॉटेल, हॉल व्यावसायिक सरकारशी बोलणार आहेत.
भविष्यात नेमका काय तोडगा निघणार?
तसेच गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखावा. अवैध प्रकार समोर आल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी ठाण्याच्या हॉटेल असोसिएशनने केली आहे. सध्या ठाण्यात पीएनजी गॅस सेवा 30 टक्के सुरू आहे. अनेक हॉटेल व्यवसायिकांना वापरासाठी पीएनजी नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, हॉटेल व्यावसायिक आक्रमक झाल्यामुळे भविष्यात सरकार यावर नेमका काय तोडगा काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
