Shivsena vs NCP : सत्तेतून बाहेर पडा मग टोरंटला विरोध करा, शिंदेच्या आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसला सुनावलं
Shivsena vs NCP : "मी या ठिकाणी जाहीरपणे सुनील तटकरेंना सांगेन आपण खालापूर तालुक्यामध्ये दारूची फॅक्टरी आणलेली आहे. दादागिरी करून त्या ठिकाणी काम सुरू आहे. ते काम त्या ठिकाणी थांबवा!"

“टोरांटो प्रकल्पाला जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या मार्फत विरोधच करायचा असेल तर अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार मधून बाहेर पडावे” असं एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी टोरान्टो वीज प्रकल्पाविरोधात आंदोलन केलं होतं. त्यावर बोलताना आमदार थोरवे यांनी प्रदेशाध्यक्ष व खासदार तटकरे, सुधाकर घारे यांना जाहीर आव्हान दिलं तसेच खालापूर तालुक्यात अनिकेत तटकरे व तटकरेंचे साडू यांच्या पार्टनर शिपमध्ये दारूची कंपनी उभारण्याचे काम चालू आहे त्या बाबतीत ही समाचार घेतला. “एकीकडे खालापूर तालुक्यातील चिलठण ग्रामपंचायतचा विरोध असूनही उजळोली येथे मुलगा व साडूच्या भागीदारीतून सर्व बोगस NOC मिळवून दारूची फॅक्टरी उभारली जात आहे. तर लोकांची काळजी असेल तर ती फॅक्टरी अगोदर बंद करा” असं महेंद्र थोरवे म्हणाले.
“मी या ठिकाणी जाहीरपणे सुनील तटकरेंना सांगेन आपण खालापूर तालुक्यामध्ये दारूची फॅक्टरी आणलेली आहे. दादागिरी करून त्या ठिकाणी काम सुरू आहे. ते काम त्या ठिकाणी थांबवा!” असं थोरवे म्हणाले. “त्या कामाला तुम्ही विरोध करायला त्या ठिकाणी जात नाही, आणि ज्या ठिकाणी पर्यावरणपूरक प्रोजेक्ट कर्जतमध्ये येत आहे, त्या प्रोजेक्टला मात्र विरोध करायला सुधाकर घारे त्या ठिकाणी जातोय. घारे यांनी जाऊन नेत्याची पहिली ती फॅक्टरी बंद करावी, मग आम्ही तुझ्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी येतो” असं महेंद्र थोरवे म्हणाले.
या मतदारसंघाने तुम्हाला नाकारलेलं आहे
“तुम्हाला काय वाटतं आम्हाला बोलता येत नाही? आम्ही डोक्यावर बर्फ ठेवून चाललेलो आहोत. तुमचा पराजय झालेला आहे. कर्जतच्या जनतेने तुम्हाला नाकारलेलं आहे. या मतदारसंघाने तुम्हाला नाकारलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी फक्त प्रोजेक्टला विरोध करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे, आणि सुनील तटकरे त्यांना पाठीशी घालत आहेत” असं महेंद्र थोरवे म्हणाले.
आमची तयारी आहे याच्यावर बोलायची
“सुनील तटकरे सत्तेमध्ये आहेत. मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, टोरांटो प्रोजेक्टला केंद्र शासनाने मंजुरी दिलेली आहे. टोरांटो प्रोजेक्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंजुरी दिलेली आहे. मग जर सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून, आणि आपली मुलगी त्या ठिकाणी राज्यामध्ये मंत्री असताना, जर आपल्याला राज्य सरकारच्या प्रोजेक्टला जर विरोध करायचा असेल, तर पहिले सत्तेमधून बाहेर व्हा आणि मग विरोध करायला समोर या, आमची तयारी आहे याच्यावर बोलायची” असं महेंद्र थोरवे म्हणाले.