
29 महानगरपालिकांच्या निवडणुका होऊन निकाल लागला असला तरी महापौरांची निवड अद्याप व्हायची आहे. येत्या गुरूवारी, 22 तारखेला महापौरपदासाठी सोडत होणार असून त्यानंतरर राज्यातील सर्व महापालिकांचे महापौर कोण होणार ते स्पष्ट होईल. या निवडीला जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीचा पहिला आठवडा सहज उजाडेल. मात्र काही ठराविक पालिका सोडता राज्यात अनेक महापालिकांमध्ये कोणत्याही पक्षाला संपूर्ण बहुमत मिळालेलं नाही, त्यामुळे संख्याबळ वाढवण्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला असून अनेक ठिकाणी नगरसेवकांची पळवापळवी सुरू आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतही सध्या हीच स्थिती असून 122 सदस्य असलेल्या या महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचे 53 तर भाजपचे 50 नगरसेवक निवडून आलेत. तिथे भाजप व शिवसेनेची युती होती. मात्र केडीएमसीमध्ये आपले संख्याबळ वाढववण्यासाठी शिंदे गट प्रयत्नशील असून अनेक नगरसेवकांना टार्गेट केलं जात आहे. फोडाफोडीच्या राजकारणाने टोक गाठलं असून शिंदे गटाकडून आता ठाकरे गटाच्या नगरसेवकांना लक्ष्य केलं जात आहे. त्यांना फोडण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र याच फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळून नुकताच निवडून आलेल्या, ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थेट पळ काढला असून तो चक्क मलंगगंड येथील जंगलात लपून बसला अशी चर्चा सुरू आहे.
फोडाफोडीचे राजकारण जोरात
शुक्रवारी महापालिका निवडणुकांचा निकाल लागला आणि त्याला 24 तासही उलटत नाहीत तोच दुसऱ्या दिवशी, शनिवारी सकाळी ठाकरे गटाचे नवनिर्वाचित उमेदवार मधुर म्हात्रे यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. एवढंच नव्हे तर त्यानंतर ठाकरे गटाच्याच आणखी एक नगरसेवक ॲड. किर्ती ढोणे याही श्रीकांत शिंदे यांना भेटल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. ठाकरे गटातही अस्वस्था पसरली. केडीएमसीमध्ये महायुतीने निवडणूक ळढवली. पण शिंद गटाच्या या हालाचालीमुळे मित्रपक्ष असलेल्या भाजपमध्येही नाराजी आहे.
नगरसेवकाची थेट जंगलात धाव
याच फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळून ठाकरे गटाचे नितीन खंबायत यांनी चक्क जंगलात धाव घेतली आणि ते तिथेच लपून बसले. खंबायत यांना कल्याण पूर्वेतून ठाकरे गटाने उमेदवारी दिली होती, ते निवडणू जिंकलेही. मात्र जिंकल्यावर त्यांना आपल्या गटात घेण्यासाठी शिंदे गट जंग जंग पछाडत होता. आपल्या पक्षात येण्यासाठी त्यांनी नितीन खंबायत यांचा पिच्छा पुरवला, त्यांना मोठी ऑफरही देण्यात आली. शिंदे गटात ते यावेत, आपल्याकडे वळावे यासाठी असंख्य प्रयत्नही करण्यात आले.
मात्र नितीन खंबायत हे काही बधले नाहीत. पक्षाशी गद्दारी करून शिंदे गटात जाण्यास ते तयार नव्हते. पण फोडाफोडीच्या या राजकारणाला कंटाळून त्यांनी थेट मलंगगड भागत घर असलेल्या जंगलात लपून बसणं पसंत केलं अशी माहिती ठाकरे गटातील ज्येष्ठ अधिकाऱ्याकडून मिळाली आहे. पक्षाशी गद्दारी करण्यापेक्षा त्यांनी काही काळ संपर्क क्षेत्राबाहेर राहण्याचे ठरवले. दबावापोटी लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे जंगलात लपून बसावे लागल्याने खळबळ माजली असून मोठी चर्चा सुरु झाली आहे.