Video : हातात आयफोन, चहाचा कप आणि…डोंगरावर संपलेल्या कुटुंबाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ

छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर आयफोन वादातून घडलेल्या हृदयद्रावक तिहेरी आत्महत्येने राज्य हादरले आहे. मुलाने घेतलेला आत्महत्येचा निर्णय, त्याला वाचवताना वडिलांचा मृत्यू आणि हे पाहून आईनेही जीव दिला. अवघ्या काही क्षणांत कुटुंबाची वाताहत झाली. या दुर्दैवी घटनेनंतर, मृत आई-मुलाच्या अतूट नात्याचे जुने व्हिडीओ व्हायरल होत असून, ते पाहून नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

Video : हातात आयफोन, चहाचा कप आणि...डोंगरावर संपलेल्या कुटुंबाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ
| Updated on: Aug 22, 2026 | 5:30 PM

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : –  शुक्रवारी दुपारी खवड्या डोंगरावर जी घटना घडली ती ऐकून अनेकजण हादरले. आयफोनच्या मुद्यावरून कुटुंबात झालेला वाद, मुलाने डोंगरावरून उडी मारण्याचा घेतलेला निर्णय, त्याला वाचवताना वडिलांचाही झालेला मृत्यू आणि ते पाहून त्याच्या आईनेही उडी मारून दिलेला जीव. अवघ्या काही क्षणात एका कुटुंबाची झालेली वाताहत पाहून अनेकांचे डोळे पाणावले नाहीत तर नवल. 19 वर्षीय कुणाल चांदगुडे आत्महत्या करण्यासाठी खवड्या डोंगरावर गेल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी गेलेले वडील मुलीधर चांदगुडेही खाली कोसळले. आणि ते पाहून आई संगीता यांनीही त्याच डोंगरावरून उडी मारून जीव दिला. वडील आणि मुलाच्या कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. वाळूज एमआयडीसी पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. मात्र अख्ख्या राज्याला हादरवणाऱ्या या घटनेने नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

या दुर्दैवी घटनेत ज्यांचा मृत्यू झाला तोच कुणाल आणि त्याची आई संगीता यांचे काही जुने व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमधून आई आणि मुलामधील अतूट नातं, जिव्हाळा आणि एकमेकांबद्दल असलेली आपुलकी प्रकर्षाने समोर येत आहे. त्यामुळे हे व्हिडिओ पाहताना नागरिकांच्या डोळ्यांतही पाणी येत असून, या कुटुंबावर ओढवलेल्या प्रसंगाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

हातात चहाचा कप, आयफोन आणि निवांत गप्पा.. तो व्हिडीओ समोर

व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये कुणाल आपल्या आईसोबत निवांतपणे चहा घेताना दिसत आहे. आई-मुलातील साध्या गप्पा, सहज संवाद आणि त्या क्षणातील आपलेपणा या व्हिडिओतून स्पष्ट जाणवतो. रोजच्या आयुष्यातील हा साधा क्षण आज मात्र अनेकांसाठी भावूक करणारी आठवण ठरताना दिसत आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या या जुन्या आठवणींमुळे कुणाल आणि त्याची आई संगीता यांच्यातील नात्याची भावनिक बाजू नागरिकांसमोर आली . आई-मुलाच्या प्रेमाचे हे क्षण आज त्यांच्या आयुष्यातील आठवणी म्हणून पाहिले जात आहेत. खवड्या डोंगरावरील कालच्या त्या दुर्दैवी घटनेनंतर हे व्हिडिओ आता समोर आल्याने डोळे न पाणावतील तरच नवल.

 

नेमकं काय घडलं ?

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील तिसगावजवळील खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मुलगा आत्महत्या करण्याच्या उद्देशाने डोंगराच्या कड्यावर गेल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी गेलेले वडीलही खाली कोसळले. त्यानंतर दोघांना खाली पडताना पाहून आईनेही डोंगरावरून उडी घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच MIDC वाळूज पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कुणाल डोंगराच्या कड्यावर उभा राहून खाली उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे आई-वजीव, गावकरी, सरपंच आणि पोलीस तसेच अग्निशमन दलाचे जवान त्याला समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करत होते.

मात्र कुणाल कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याच्याशी बोलता बोलता कुणालचे वडील मुलीधर यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणाल डोंगराच्या कड्यावरून खाली पाहत असताना त्याचा तोल गेल्याने तो खाली पडला. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलीधर हेही डोंगरावरून खाली कोसळले. दोघे खाली पडताना पाहून आई संगीता यांनीही डोंगरावरून उडी घेतली आणि एक अख्ख कुटुंब क्षणार्धात उद्ध्वस्त झालं.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us