शायना एनसींना खाडकन थोबाडीत…ठाकरेंची शिवसेना भडकली, पेडणेकरांचा शिंदे गटाला थेट इशारा

शायना एनसींनी फोटो फाडल्याने राजकीय वर्तुळात संतापाची लाट पसरली आहे. ठाकरे गटाने कार्यकर्त्यांकडून शायना एनसी यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

शायना एनसींना खाडकन थोबाडीत...ठाकरेंची शिवसेना भडकली, पेडणेकरांचा शिंदे गटाला थेट इशारा
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 19, 2026 | 11:53 AM

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी एका पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला. परंतु या फोटोत बाळासाहेब ठाकरे देखील होते. या फोटो फाडण्यावरून ठाकरे गटाने आक्षेप घेतला. फोटो फाडण्याचा प्रकाराचा सर्वत्र पडसाद उमटताना दिसत आहे. शायना एनसी यांनी माफी मागितल्यानंतर ठाकरे गटाचा आक्रमकपणाा कायम असल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनीही शायना एनसी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘ शायना एनसींना खाडकन थोबाडीत देऊ, त्यानंतर आम्ही त्यांची माफी मागू, असे केल्यावर चालेल का? हा आमच्या दैवताचा प्रश्न आहे. आमचे दैवत, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा प्रश्न आहे.  त्या पुस्तकात कुठेही बाळासाहेब ठाकरे यांचा कुठेही उल्लेख नाही. मग बाळासाहेब ठाकदरे यांचा फोटो न्यायचा कशाला…तुम्हाला प्राथमिक स्वरुपात फोटो फाडायचे होते. तेवढेच फोटो न्यायचे होते. या शाह सेनेने बाळासाहेबांचा फोटो नेलाच कशाला, असा सवाल यावेळी त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडण्यावरून दादरमधील शिवसेना भवन परिसरात आंदोलन केलं जाणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

Loading...

शायना एनसींची पोस्ट जशीच्या तशी 

शायना एनसी यांनी म्हटलं की, ‘काही माणसं आणि काही नाती आयुष्यभर काळजाच्या एका कोपऱ्यात घर करून राहतात. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझ्या आयुष्यातील असेच पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व. मी लहान असताना पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटले. ते माझ्या वडिलांचे अत्यंत जिवलग मित्र होते. आमच्या कुटुंबाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक वर्षे त्यांचा अखंड सहवास आम्हाला लाभला, आशीर्वाद मिळाले. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणी, म्हणजेच माझ्या लग्नालाही ते आवर्जून उपस्थित राहिले होते. बाळासाहेब हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे एक अद्वितीय आणि तेजस्वी नेतृत्व होते.

‘प्रखर देशभक्त, कट्टर आणि अभिमानी हिंदू, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निस्सीम चाहते. हिंदुत्वाच्या विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. काँग्रेसच्या विचारधारेविरोधात त्यांनी कायम ठाम आणि निर्भीड भूमिका घेतली.  त्यांच्या विचारांमधील स्पष्टता, रोखठोकपणा आणि धगधगते तेज मला नेहमीच प्रेरणा देत आले आहे. कालच्या पत्रकार परिषदेत मी बाळासाहेबांच्या विचारांचा संदर्भ दिला. मात्र, माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. माझा हेतू बाळासाहेबांचा अनादर करण्याचा कधीच नव्हता; उलट, त्यांनी आयुष्यभर जपलेल्या ज्वलंत विचारांमधूनच मी प्रेरणा घेते’.

‘बाळासाहेबांविषयी तमाम जनतेच्या मनात असलेली श्रद्धा आणि प्रेम मला पूर्णपणे समजते. माझ्यासाठी आणि कोट्यवधी लोकांसाठी बाळासाहेब हे केवळ एक नेते नव्हते, तर दैवत होते. माझ्या कृतीमुळे जर खऱ्या शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर मी मनापासून त्यांची माफी मागते. पण, ज्यांनी माझ्या या कृतीचा विपर्यास करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मला ठणकावून सांगायचे आहे की—बाळासाहेबांवरचे माझे प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही! सत्ता आणि स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्यांनी मला बाळासाहेब शिकवू नयेत. काही नाती आणि काही ऋणानुबंध तुमच्या सत्तेच्या आणि स्वार्थाच्या राजकारणापलीकडे असतात. बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी हीच माझी खरी ताकद आहे, आणि ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us