कार्यकर्त्यांच्या गराड्यात बंटी पाटील ढसाढसा रडले; म्हणाले, पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो…

Congress Leader Satej Patil Speech : मधुरिमा राजे यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर सतेज पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटले तेव्हा कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटील यांना अश्रू अनावर झाले. सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांना शब्द दिला. सतेज पाटील काय म्हणाले? वाचा...

कार्यकर्त्यांच्या गराड्यात बंटी पाटील ढसाढसा रडले; म्हणाले, पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो...
सतेज पाटील, काँग्रेस नेते
Image Credit source: tv9
| Updated on: Nov 05, 2024 | 8:29 AM

विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूरच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आलाय. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी माघार घेतली. त्यांनी आपला निवडूक अर्ज मागे घेतला. यावेळी जे काही घडलं ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. सतेज पाटील यांना राग अनावर झाला. दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग… मी पण दाखवली असती माझी ताकद! असं सतेज पाटील म्हणाले. त्यानंतर ते भुदरगडला गेले. सतेज पाटलांच्या उपस्थितीत राहुल देसाई यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. तोपर्यंत सतेज पाटलांनी आपल्या भावना दाबून ठेवल्या होत्या. त्यानंतर रात्री सतेज पाटील त्यांच्या कार्यककर्त्यांना भेटले अन् त्यांना अश्रूंचा बांध फुटला.

सतेज पाटील संतापले

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मधुरिमा राजे यांना उमेदवारी मिळावी म्हणून सतेज पाटलांनी जीवाचं रान केलं. पण जेव्हा लढण्याची वेळ आली तेव्हा मधुरिमा राजे यांनी माघार घेतली. त्यामुळे सतेज पाटील नाराज झाले, त्यांना राग अनावर झाला. त्यांनी त्यांचा संताप माध्यमांसमोरही व्यक्त केला.

सतेज पाटील आज निर्णय घेणार

शप्पत सांगतो की, जे काही का घडलं, त्याची मला अजिबात कल्पना नव्हती. माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो की मला काहीही माहिती नाही की हे नेमकं का घडलं. का असं घडलं, कशासाठी माघार घेतली, याची मला कल्पना नाही. मी त्यांच्यावर काहीही चुकीचं बोलणार नाही. त्यांनी निर्णय घेतला आहे. तो काही आता माघारी घेऊ शकणार नाही. पण आता जे समोर आहे, त्याला तुम्ही म्हणालात तर सामोरं जायचं… उद्यापर्यंत मला वेळ द्या. मलाही थोडा विचार करू द्या. मीही माणूस आहे. मलाही भावना आहे. जे घडलं. त्याबद्दल विचार करतो. उद्या म्हणजे आज आपण यावर निर्णय घेऊ, असं सतेज पाटील म्हणाले.

मी गाडीतून येताना जाकीरला म्हटलं की मला माहिती नाही की काय होणार आहे. कारण मी अजूनपर्यंत रडलेलो नाही…. असं सतेज पाटील म्हणाले अन् त्यांना अश्रू अनावर झाले. मी कुणावरही टीका टिपण्णी करणार नाही. जे घडलं त्याला सामोरं जायचं सामर्थ्य तुम्ही मला द्यावं, असं सतेज पाटील म्हणाले. याच वेळी बंटीसाहेब तुम आगे बढो हम तुम्हापरे साथ है, अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.