खवड्या डोंगर मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट, कुणालचे वडील घरातून 3 महिने…काय समोर आलं?
Khavdya Dongar Death : कुणालने आयफोनच्या ईएमआयमुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. परंतु त्याच्या घरात काही दिवसांपासून वाद असल्याचे सांगितले जातेय.

ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक घटना घडली. शहरातील खवड्या डोंगरावर एका तरुणाने आत्महत्या करून आपले जीवन संपवले. एकाच कुटुंबातील तिघाचा मृत्यू झाल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव कुणाल चांदगुडे असे आहे. मुरलीधर चांदगुडे आणि संगीता चांदगुडे अशी त्याच्यासोबत डोंगरावरून उडी घेणाऱ्या त्याच्या आई-वडिलांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. संपूर्ण थरारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वरवर कुणालने आयफोनच्या ईएमआयमुळे आत्महत्या केल्याचे बोलले जात असले तरीही त्याच्या मृत्यूचे कारण वेगळेच असू शकते, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
खवड्या डोंगरावर काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात बजाजनगर परिसरात खवड्या डोंगर या नावाचा एक डोंगर आहे. त्या डोंगरावर शुक्रवारी मृत्यूचा थरार पाहायला मिळाला. अवघ्या 19 वर्षाचा कुणाल चांदगुडे हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. त्या डोंगरावर फिरायला आलेले अनेकजण त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. विशेष म्हणजे त्याचे वडील आणि आईदेखील त्याला समजावत होते. वडिलांनी जवळ जात त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याचा हात धरून खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु याच वेळी कुणालने वडिलांना पकडून थेट डोंगरावरून उडी घेतली. त्यानंतर पती आणि मुलगा डोंगरावरून खाली पडल्याचे लक्षात येताच कुणालच्या आईनेही डोंगरावरून थेट उडी घेतली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
घरात होते वाद?
दरम्यान, कुणालने आयफोनच्या ईएमआयमुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. परंतु त्याच्या घरात काही दिवसांपासून वाद असल्याचे सांगितले जातेय. चांदगुडे कुटुंबात सातत्याने कलह सुरू असायचा. कुणालचे वडील मुरलीधर हे कामाच्या निमित्ताने सतत बाहेर असायचे. आतादेखील ते 3 महिन्यांपासून बाहेरगावी होते. ते दोन दिवसांपूर्वी घरी परतले होते. घरी येताच त्यांच्या घरात वाद सुरू झाला होता. त्यामुळे कुणालच्या आणि त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूमागे आयफोन हे कारण होते की याला कौटुंबिक कलहाची किनार होती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.