विलनिकरण झाल्याशिवाय संप मागे नाही; शशांक राव यांचा एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा

गेल्या सहा दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आता या आंदोलनाला संघर्ष कामगार संघटनेचे नेते शशांक राव यांनी देखील पाठिंबा दिला आहे.

विलनिकरण झाल्याशिवाय संप मागे नाही; शशांक राव यांचा एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 8:39 AM

सांगली – गेल्या सहा दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आता या आंदोलनाला संघर्ष कामगार संघटनेचे नेते शशांक राव यांनी देखील पाठिंबा दिला आहे. सांगलीमध्ये सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट देत त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी राव यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित देखील केले.  विलनिकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाही, संप चिरडवण्यापेक्षा सकारात्मक भूमिका घ्यावी, असे राव यांनी म्हटले आहे.

सरकारचे संपाकडे दुर्लक्ष 

प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडताना राव म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सहा दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. बस बंद असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. मात्र तरी देखील शासन या संपाकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन, राज्य परिवहन महामंडळाचे विलनिकरण करावे. महामंडळाची मालमत्ता आपल्या ताब्यात घेऊन, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाचे कर्मचारी म्हणून घोषीत करण्यात यावे. आमच्या या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही लढा मागे घेणार नाहीत, असा इशारा यावेळी राव यांनी दिला आहे.

‘संप मोडीत काढण्याचा डाव ‘

एसटी कामगारांची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे, त्यांना अगदीच तुटपुंजा पगार मिळतो. त्याच वेतनामध्ये त्यांना त्यांचे घर चालवावे लागेत. गेल्या अनेक महिन्यांपासून तोही वेळेवर मिळत नाही, त्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. मुख्यमंत्री परिवहन मंत्री यांच्यासोबत कामगारांच्या समस्येबाबत वारंवार चर्चा झाली. मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागल्याचे राव म्हणाले आहेत. तसेच हा संप मिटवण्याऐवजी संप मोडीत काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

संबंधित बातम्या 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट? मुंबई सेंट्रल आगारातून पहिली एसटी धावली; राज्यात 826 एसटी रस्त्यावर

VIDEO: त्रिपुरा घटनेचे थेट भिवंडीत पडसाद, रॅलीनंतर संपूर्ण शहरात कडकडीत बंद