Laxman Hake: ओबीसींचं आरक्षण संपवलं, आठ मंत्री असूनही कोणी बोलत नाही; लक्ष्मण हाकेंचा संताप, म्हणाले- जीवन संपवावं वाटतंय…
OBC Leader Laxman Hake Breaks Down Over Reservation Issue: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके हतबल झाले आहे. त्यांनी एक वक्तव्य केले आहे यामुळे आता नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.

राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ओबीसी आरक्षण संपल्याचा आरोप करताना हाके यांनी आपली तीव्र नाराजी आणि हतबलता व्यक्त केली. किती समजावून सांगू ओबीसींना, किती ओरडू मुख्यमंत्र्यांना? आता निराश झालो आहे. उडी मारावी वाटते, जीवन संपवावं वाटतं, असं धक्कादायक वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं. ते नांदेडमध्ये बोलत होते. त्यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
ओबीसी आरक्षणाच्या लढ्याला लोकांची पुरेशी साथ मिळत नसल्याने तुम्ही निराश आहात का, असा प्रश्न हाके यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी आरक्षणाच्या सद्यस्थितीवर नाराजी व्यक्त केली. राज्यकर्त्यांनी, विशेषतः भाजपने ओबीसींचं आरक्षण संपवल्याचा आरोपही त्यांनी केला. ओबीसी समाजाला सातत्याने जागं करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र समाजातील लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
राज्य मंत्रिमंडळात ओबीसी समाजाचे आठ मंत्री आहेत. मात्र आरक्षणाच्या प्रश्नावर यापैकी कोणीही ठामपणे बोलायला तयार नसल्याचा आरोप हाके यांनी केला. ‘किती सांगू ओबीसींना, किती समजावून सांगू मुख्यमंत्र्यांना? कोणीही बोलायला तयार नाही. किती ओरडू मी? अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ज्या नेत्याने स्वतःचा डीएनए ओबीसी असल्याचं सांगितलं, त्याच नेत्याने ओबीसींचं आरक्षण संपवलं, अशी टीकाही त्यांनी केली. त्यांच्या या विधानाचा रोख राज्यातील सत्ताधारी नेतृत्वाकडे होता.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण रात्रंदिवस संघर्ष करत असल्याचं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं. ‘मी ओबीसींसाठी रात्रंदिवस लढतोय. श्वाससुद्धा ओबीसी म्हणून घेतोय. त्या माणसाने आता काय करायचं?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून हाके यांनी व्यक्त केलेली हतबलता आणि जीवन संपवण्याबाबत केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं आहे. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांच्या वक्तव्यातून पुढे आली आहे.