
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने सगळीकडे लगबग सुरू आहे. आज 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख होती. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. बऱ्याच ठिकाणी एकाच घरातील उमेदवार आमने-सामने आले आहेत. काही ठिकाणी काका-पुतणे तर काही ठिकाणी सख्या जावांनी एकमेकींच्या विरोधात अर्ज भरले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सांगलीतील शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत काका विरुद्ध पुतणे अशी थेट लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी युती केली आहे. राष्ट्रवादीच्या या युतीकडून शिराळा नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून अभिजीत विजयसिंह नाईक यांनी अर्ज दाखल केला आहे.
दुसरीकडे भाजप आमदार सत्यजित देशमुख, भाजप जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक व शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी पृथ्वीसिंग भगतसिंग नाईक यांना उमेदवारी मिळाली असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता शिराळ्यात काका अभिजीत विजयसिंह नाईक विरूद्ध पुतण्या पृथ्वीसिंग भगतसिंग नाईक अशी लढत पहायला मिळणार आहे.
संगमनेर नगरपालिकेतही दोन आमदारांच्या नातेवाईकांमध्ये लढत रंगणार आहे. एकीकडे विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा खताळ यांनी महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पुन्हा आमने-सामने आले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार हे बारामती नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.