
लोकसभा निवडणुकीदरम्यान महायुतीमधील पेच अजून कायम आहे. नाशिकमधील जागेचा तिढा सुटला नाही. नाशिकमधील जागेवर तोडगा निघत नसल्यामुळे मागील आठवड्यात मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. आपणास निवडणूक लढवण्यास केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सांगितले होते. परंतु महायुतीमधील जागेबाबत एकमत होत नाही. विरोधी गटाचा उमेदवार जाहीर झाला आहे. त्यामुळे आपण लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे भुजबळ यांनी म्हटले. परंतु भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून दाबावतंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी आता महायुतीत दबावतंत्र सुरु केले आहे. समता परिषदेच्या मध्यमातून भुजबळ यांनी ओबीसीचा दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यासाठी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधून समता परिषदेच्या पदाधिकाऱ्याने उमेदवारी अर्ज घेतले आहेत. राज्यातील ओबीसींची ताकत दाखवण्यासाठी भुजबळांचे समर्थक लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत.
नाशिकमधून दिलीप खैरे तर संभाजीनगरमधून मनोज घोडके यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहे. ज्या भुजबळांनी आजवर अनेक जणांना उमेदवाऱ्या दिल्या त्या भुजबळांना उमेदवारीसाठी ताटकळत ठेवल्याने आम्ही आता ओबीसींची ताकत दाखवणार आहे, असे भुजबळ समर्थकांकडून म्हटले जात आहे.
नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेची आहे. या ठिकाणी शिवसेनाच निवडणूक लढवणार आहे, असे हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे. आपला प्रचार झालेला आहे. फक्त उमेदवारी औपचारिकता शिल्लक राहिली आहे. तीन तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, त्या अगोदर उमेदवारी जाहीर करावीच लागेल. परंतु उमेदवारी लवकर जाहीर करावी, असा आपला आग्रह आहे. आता महायुतीचे सर्व नेते याविषयी निर्णय घेतील आणि एक दोन दिवसांत निर्णय होईल, असे हेमंत गोडसे यांनी म्हटले.