कुठे सिलेंडरसाठी रात्रभर पहारा, तर कुठे साखळदंडाने बांधले सिलेंडर; महाराष्ट्रात गॅस टंचाईचा भडका, कुठे काय स्थिती?
इराण-इस्रायल युद्धाच्या तणावामुळे महाराष्ट्रात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबईत सिलिंडर वाचवण्यासाठी नागरिक ते साखळदंडाने बांधत आहेत, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १.२६ कोटींचा काळाबाजार उघडकीस आला आहे.

सध्या जागतिक स्तरावर अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या वाढत्या तणावाचे थेट परिणाम आता महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात दिसू लागले आहेत. मुंबई, नागपूर, अमरावती आणि जळगाव यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक संतप्त होऊन रस्त्यावर उतरले आहेत.
मुंबईच्या मालवणीत गॅससाठी रात्रीचा पहारा
मुंबईतील मालाडमधील मालवणी हा अत्यंत दाट वस्तीचा परिसर सध्या गॅस टंचाईचा केंद्रबिंदू ठरला आहे. गॅस एजन्सीबाहेर लागलेल्या लांबच लांब रांगेत आपले सिलिंडर चोरीला जाऊ नयेत किंवा कुणी रांगेतील क्रम बदलू नये, यासाठी नागरिकांनी साखळदंडाने ४-५ सिलिंडर एकत्र बांधून त्यांना कुलूप लावले आहे. अनेक नागरिक रात्री १० वाजेपासूनच रस्त्यावर रांगा लावून बसत आहेत. यात महिलांची संख्या मोठी असून, घरकाम आणि मजुरी सोडून त्यांना भर उन्हात उभे राहावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर काल संतप्त मालवणीकरांनी गेट नंबर १ वर रस्ता रोको करत वाहतूक रोखून धरली होती. बुकिंग होऊनही गॅस मिळत नाही आणि विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे मिळतात, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये टंचाईच्या काळात गॅसची काळाबाजारी
एकीकडे जनता गॅससाठी रस्त्यावर उतरली असताना, दुसरीकडे गॅस चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दक्षता पथकाने मोठी कारवाई केली आहे. राज्यस्तरीय दक्षता पथकाने गंगापूर तालुक्यातील वैजापूर रोडवरील खोजेवाडी शिवारात धाड टाकली. यावेळी एका हॉटेलच्या मागे टँकरचे सील तोडून गॅस चोरी केली जात होती. पोलिसांनी ३५,२२० किलो एलपीजी गॅससह दोन मोठे कॅप्सूल टँकर जप्त केले आहेत. या मुद्देमालाची किंमत १ कोटी २६ लाख रुपये आहे. यामुळे हजारो कुटुंबांचे नुकसान झाले आहे. जप्त केलेल्या गॅसमुळे किमान २४८० कुटुंबांची महिन्याची चूल पेटली असती, इतका हा साठा मोठा होता.
नागपूर आणि अमरावतीत गॅस पुरवठा विस्कळीत
नागपुरात सलग १७ ते १८ दिवसांपासून अनेक भागांत गॅस पुरवठा विस्कळीत आहे. ऑनलाईन बुकिंग यंत्रणा कोलमडली असून नो स्टॉकचे बोर्ड एजन्सीबाहेर पाहायला मिळत आहेत. इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम म्हणून आयातीवर परिणाम झाल्याचे स्थानिक वितरकांचे म्हणणे आहे. तसेच अमरावतीच्या अंबादेवी मंदिर परिसरातील भारत गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा कमी होण्याचे नाव घेत नाहीत. एजन्सीने केवळ होम डिलिव्हरी मिळेल असे बोर्ड लावले असले, तरी अनेक दिवस वाट पाहूनही गॅस घरी येत नसल्याने नागरिक स्वतः एजन्सीवर गर्दी करत आहेत.
सर्वांना गॅस देण्याचे आश्वासन
जळगावच्या जामनेरमध्ये समर्थ गॅस एजन्सीच्या कारभाराविरोधात नागरिकांनी जामनेर-छत्रपती संभाजीनगर महामार्ग दीड तास रोखून धरला. एजन्सीकडून फोन आल्यावर नागरिक पहाटेपासून रांगेत उभे राहिले, पण सकाळी ११ वाजता स्टॉक संपला असे सांगण्यात आल्याने नागरिकांचा संयम सुटला. अखेर पोलीस आणि पुरवठा अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून सर्वांना गॅस देण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
सध्याच्या गॅस टंचाईमागे प्रामुख्याने दोन कारणे सांगितली जात आहेत. इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या पुरवठा साखळीवर (Supply Chain) परिणाम झाला आहे. तर अनेक ठिकाणी गॅस असूनही त्याची काळाबाजारी किंवा साठेबाजी केली जात असल्याची शंका नागरिक व्यक्त करत आहेत.