मी नग्नावस्थेत होतो म्हणून लखनदादांनी मला… हॉटेल 7777च्या मॅनेजरची कबुली; नेमकं काय घडलं होतं?

सोलापूरच्या माढ्यातील हॉटेल 7777 चा मॅनेजरला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हॉटेल मालक लखन माने यांनी मॅनेजर नग्नावस्थेत आढळल्याने मारहाण केल्याचे सांगितले, तर मॅनेजर श्रीनिवास नखाते यांनी दारूच्या नशेत असल्याने कपडे काढल्याची कबुली दिली. तीन महिन्यांपूर्वीच्या या घटनेवर दोन्ही बाजूंकडून स्पष्टीकरण देत बदनामीचा प्रयत्न असल्याचा दावा केला जात आहे.

मी नग्नावस्थेत होतो म्हणून लखनदादांनी मला... हॉटेल 7777च्या मॅनेजरची कबुली; नेमकं काय घडलं होतं?
माढ्यातील हॉटेल 7777 च्या मॅनेजरला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Nov 15, 2025 | 1:23 PM

सोलापूरच्या माढ्यातील प्रसिद्ध असलेल्या हॉटेल 7777चा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत हॉटेलचा मालक मॅनेजरला बेदम मारहाण करताना दिसत आहे. त्यामुळे या हॉटेल मालकावर जोरदार टीका होत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची तुफान चर्चा रंगलेली असतानाच हॉटेलचा मालक आणि मॅनेजर यांनी या व्हिडीओबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ तीन महिन्यापूर्वीचा असल्याचं दोघांचंही म्हणणं आहे. तसेच हा व्हिडीओ आताच का व्हायरल झाला? असा सवाल करत आमची बदनामी केली जात असल्याचं हॉटेल मालकाचं म्हणणं आहे. मॅनेजर हॉटेलात नग्नावस्थेत फिरत असल्यामुळेच त्याला मारहाण केल्याचा दावा हॉटेल मालकाने केला असून मॅनेजरनेही त्याला दुजोरा दिला आहे.

माढ्याच्या टेंभुर्णी येथे हॉटेल 7777 आहे. या हॉटेलचा मालक लखन माने यांनी मॅनेजर श्रीनिवास नकाते यांना मारहाण केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तीन महिन्यापूर्वीचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ अचानक व्हायरल झाल्याने माने आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका होत आहे. सोशल मीडियातून होत असलेल्या या बदनामीवर लखन माने यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून नेमका प्रकार काय आहे? आणि कशापद्धतीने गैरसमज पसरवले जात आहेत, याचा खुलासा केला आहे.

बातम्या चुकीच्या

या संपूर्ण प्रकरणावर लखन माने यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझ्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहे. माझ्या घरच्यांच्या नावावर फेक आयडी तयार करून माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी केली जात आहे. माझ्या हॉटेलची बदनामी केली जात आहे. मी नंतर त्याकडे बघेलच. त्या दिवशी मी मॅनेजरला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याची सत्यता न पाहता माझ्यावर टीका केली जात आहे, असं लखन माने म्हणाले.

हे थांबलं पाहिजे

त्या दिवशी मी बाहेर गावी गेलो होतो. मॅनेजर ड्रिंक करून हॉटेलमध्ये नग्नावस्थेत फिरत होता. मला हॉटेलातून फोन आला. सर्व प्रकार सांगितला गेला आणि तातडीने हॉटेलवर बोलावलं. त्यामुळे मी आलो. मी मॅनेजरला समजावलं. त्याला मारहाण केली. पण माझा हेतू चुकीचा नव्हता. लहान भावाप्रमाणे मी त्याला वागवतो. पण माझी बदनामी केली गेली. सत्य काय आहे, ते पाहा. आम्ही हॉटेलात एक कुटुंब म्हणून काम करतो. हा व्हिडीओ चार ते पाच महिन्यापूर्वीचा आहे. आजही हाच मॅनेजर हॉटेल पाहत आहे. माझ्या मनात काही असतं तर मी मॅनेजरला काढून टाकलं असतं. मी कष्टाने हॉटेल उभं केलं आहे. पण आमची बदनामी केली जात आहे, हे थांबलं पाहिजे, असं आवाहन माने यांनी केलं.

 

म्हणून दादाने मारलं

तर मॅनेजर श्रीनिवास नखाते यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं. त्या दिवशी मी ड्रिंक केली होती. आणि हॉटेलमध्ये नग्नावस्थेत फिरत होतो. त्याच अवस्थेत मी काऊंटरला आलो होतो. त्यामुळे दादांनी मला मारहाण केली. मी आठ महिन्यापासून मॅनेजर म्हणून कामाला आहे. मी घरगुती टेन्शनमुळे ड्रिंक केली होती. मला काय करायचं ते सूचत नव्हतं. त्यामुळे मी कपडे काढून नग्नावस्थेत फिरत होतो. म्हणून दादाने मला मारलं, असं श्रीनिवास नकाते म्हणाले.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी दादांना फोन केला. म्हटलं मला काम करायचं आहे. माझं चुकलं. पुन्हा असं करणार नाही. मी दादांची माफी मागितली. त्यामुळे दादाने मला कामावर ठेवलं. मला काम करण्याशिवाय पर्यायच नाही. माझी घरची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे आज हा व्हिडीओ कुणी व्हायरल केला. का केला माहीत नाही. पण ज्याने कुणी केला असेल त्याने तो डीलिट करा. माझी चूक होती. त्यामुळे माझं काही म्हणणं नाही, असंही नखाते यांनी सांगितलं.