Video : कुत्रा आणि बिबट्यात लढाई, बाजी मारली कुत्र्याने; व्हिडीओ एकदा पाहाच !

महाबळेश्वरच्या भिलार येथील एका बंगल्यात बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. कुत्र्याने प्रसंगावधान राखत बिबट्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि त्याला पळवून लावले. हा थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.

Video : कुत्रा आणि बिबट्यात लढाई, बाजी मारली कुत्र्याने; व्हिडीओ एकदा पाहाच !
कुत्र्याने परतवला बिबट्याचा हल्ला
| Updated on: Aug 20, 2026 | 5:40 PM

रात्रीची वेळ, चहूकडे अंधार, किर्र शांतता,आजूबाजूला एक चिटपाखरूही नाही.. तेवढ्यात दबक्या पावलांनी चालत, आजूबाजूचा कानोसा घेत एक बिबट्या बंगल्याच्या आवारात शिरला. हळूहळू एकेक पायरी चढत, इकडे तिकडे पाहत तो बंगल्याच्या व्हरांड्यात आला. समोर शिकार दिसताच तो झेपावला, मात्र तेवढ्यात जोराने भुंकण्याचे , झटापटीचे आवाज आले, एकच कल्लोळ उठला. बंगल्यात असलेल्या श्वानाने शिकारी बिबट्याला पाहिलं आणि संरक्षणासाठी तो सज्ज झाला. बिबट्याने त्याच्यावर झडप घालण्याआधी त्या श्वानानेच त्याच्यावर हल्ला केला. अचानक कुत्रा चालून आल्यामुळे बिबट्या सटपटला, चांगलाच घाबरला आणि शिकार करण्याचा इरादा सोडून तो मागे फिरला. जीव वाचवण्यासाठी त्याने बंगल्याच्या त्याच पायऱ्यांवरून खाली धाव घेतली आणि अंधारात धूम ठोकली. तो श्वानही त्याच्यापाठोपाठ गेला, मात्र बिबट्या अंधारात पुढे गायब झाला. बंगल्यातील रक्षकही तेवढ्यात तिथे धावून आला, बिबट्याला त्याने पळवून लावलं. बंगल्याच्या सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला. रात्रीच्या अंधारात झालेल्या या थरारक प्रसंगाची सर्वत्र चर्चा रंगली.

नेमकं काय घडलं ?

महाबळेश्वरच्या निसर्गरम्य भिलार परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावराने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच ‘9 बेरी कॅसल’ या बंगल्याच्या आवारात बिबट्याने चक्क एका कुत्र्यावर झडप घालत हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना समोर आली. मात्र त्या कुत्र्याने प्रसंगावधान राखत बिबट्याला जोरदार प्रतिकार केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, बिबट्याचा अचानक झालेला प्रवेश आणि त्यानंतर कुत्र्याने दिलेली झुंज पाहून परिसरात खळबळ उडाली.

अचानक बिबट्याची एन्ट्री; कुत्र्यावर झडप

भिलारमधील ‘ 9 बेरी कॅसल’च्या आवारात नेहमीप्रमाणे कुत्रा बसलेला असताना दबक्या पावलांनी आलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. काही क्षणांतच बिबट्याने कुत्र्याला आपल्या तावडीत घेण्याचा प्रयत्न केला. बंगल्याच्या परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित व्यक्तीच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. मात्र, बिबट्याच्या हल्ल्याला कुत्र्याने घाबरून न जाता जोरदार प्रतिकार केला. कुत्र्याने बिबट्याशी झुंज देत त्याला मागे हटण्यास भाग पाडलं. कुत्र्याच्या या प्रतिकारामुळे बिबट्याने अखेर तेथून पळ काढला आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.

 

सीसीटीव्हीत कैद झाला थरार

विशेष म्हणजे बिबट्याचा हा संपूर्ण हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. बंगल्याच्या आवारात बिबट्याचा वावर, कुत्र्यावर टाकलेली झडप आणि त्यानंतरची झुंज या सगळ्या घटना कॅमेऱ्यात कैद झाल्या. या घटनेमुळे भिलार परिसरात बिबट्याचा वावर किती वाढला आहे, याची पुन्हा एकदा जाणीव झाली. विशेषतः मानवी वस्तीजवळ आणि बंगल्यांच्या आवारात बिबट्याचा मुक्तपणे वावर होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भिलार आणि आसपासच्या परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याचे स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या मानवी वस्तीजवळ येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाळीव प्राणी तसेच लहान मुलांच्या सुरक्षेबाबतही पालक चिंतेत आहेत.

दरम्यान, नागरिकांनी सतर्क रहाव असं आवाहन वनविभागाने केलं आहे. रात्रीच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावं, एकट्याने अंधाऱ्या भागातून जाऊ नये, तसेच घराच्या परिसरात पुरेसा प्रकाश ठेवावा, अशी काळजी घेणे आवश्यक असल्याचं वनविभागाने सांगितलं आहे. विशेषतः लहान मुले आणि पाळीव प्राणी यांच्यावर लक्ष ठेवावं, असे आवाहन करण्यात आलं .

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us