सातारा आहे की बिहार? मध्यरात्री महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा; अवघ्या 15 मिनिटांत…नेमकं काय घडलं?
मध्यरात्री महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोड्याची घटना घडली आहे. प्रवासी गाढझोपेत असतानाच ट्रेनमध्ये भयंकर प्रकार घडला. या घटनेने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोड्याची घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. प्रवासी गाढझोपेत असताना चोरट्यांनी डाव साधला. सातारा जिल्ह्यात घडलेल्या दरोड्याच्या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील साताऱ्यात सालपे रेल्वे स्थानकाजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोड्याची घटना घडली आहे. महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा टाकण्यासाठी चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेच्या वायर कापल्या. चोरट्यांनी वायर कापून महालक्ष्मी एक्स्प्रेस 15 मिनिटे रोखून धरली. ट्रेन थांबल्यानंतर चोरट्यांनी खिडकीतून हा घालून दोन महिला प्रवाशांचे 52 हजार 600 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून नेलं.
एक्स्प्रेसवर दरोडा पडल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने पहाटे सव्वापाच वाजेपर्यंत दुरुस्ती करत सिग्नल यंत्रणा पूर्ववत केली. या सिग्नल तोडफोडीबाबत लोणंद आरपीएफमध्ये आणि दागिने चोरी प्रकरणी मिरज लोहमार्ग पोलिसांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरोड्यानंतर पोलिसांकडून श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने याचा सखोल तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
साताऱ्याच्या सालपा स्टेशनजवळ रविवारी मध्यरात्री अचानक ट्रेन थांबली. ट्रेन थांबल्याने कोणाला काहीच समजले नाही. याच संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला. चोरट्यांनी एक्स्प्रेसच्या एस-2, एस-3 आणि एस-5 डब्यांमध्ये प्रवेश केला. मुंबईतील रहिवासी सुनिता गोरक्षनात तुपे आणि सहप्रवासी सुरेखा खाडे (खोपोली) हे कौटुंबिक कार्यक्रमांसाठी कोल्हापूरला निघाले होते. या दरोडेखोरांनी त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने खिडकीचा आधार घेऊन हिसकावले.
चोरी केल्यानंतर दरोडेखोरांनी पळ काढला. परंतु या चोरट्यांनी रेल्वेवरच दगडफेक केली. या दरोड्याच्या घटनेने प्रवाशांमध्ये मोठी दहशत पसरली. सिग्नल यंत्रणेत नेमका बिघाड कसा झाला, याचा प्रश्न प्रशासनाला पडला. तसेच हा दरोडा पूर्वनियोजित कट होता का, यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. आता पोलिसांचं पथक हे पुढील कारवाईसाठी साताऱ्याला रवाना झाले आहेत. दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.