अजित पवार ॲक्टिव्ह होताच शरद पवार गटाचा आमदार भेटीला, म्हणाला “त्यांच्या चेहऱ्यावर…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिंदे यांनी अजित पवारांच्या तब्येतीबद्दल आणि महायुतीतील काही नेत्यांच्या नाराजीबद्दलही भाष्य केले आहे. या भेटीचा महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.

अजित पवार ॲक्टिव्ह होताच शरद पवार गटाचा आमदार भेटीला, म्हणाला त्यांच्या चेहऱ्यावर...
शशिकांत शिंदे अजित पवार भेट
| Updated on: Dec 18, 2024 | 1:05 PM

Shashikant Shinde Meet Ajit Pawar : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी मोठ्या वेगाने घडत आहेत. सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवस अनुपस्थितीत असल्याने चर्चांना उधाण आले होते. त्यातच आज सकाळीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या.

आज (१८ डिसेंबर) रोजी सकाळीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. नागपुरातील विजयगड या शासकीय निवासस्थानी अजित पवार आणि शशिकांत शिंदे यांची भेट झाली. यावेळी त्यांनी अजित पवारांना पुष्पगुच्छ दिले. या भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे. या भेटीदरम्यान अजित पवार आणि शशिकांत शिंदे यांच्यात काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र यामुळे राजकारणात काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांसोबत कोणत्या विषयावर चर्चा झाली, ते दोन दिवस नॉट रिचेबल का होते, याची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी अजित पवारांना काही राजकीय आजार असेल असे वाटत नाही, असे सूचक विधानही केले.

लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना शुभेच्छा देणं हे कर्तव्य

“राज्याचे नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर आम्ही सर्वाना शुभेच्छा देत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना शुभेच्छा देणं हे कर्तव्य आहे. गेले दोन दिवस अजित पवारांची भेट झाली नव्हती. आज मी अजित पवारांकडे भेटीसाठी वेळ मागितला तर त्यांनी वेळ दिला. त्यांना उपमुख्यमंत्री झाले म्हणून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. मी त्यांना दोन मिनिट भेटलो, त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी माझी विचारपूस केली. मी त्यांची विचारपूस केली आणि मी निघालो”, असे शशिकांत शिंदे म्हणाले.

“राजकीय आजार असेल असे वाटत नाही”

“अजित दादांची तब्येत थोडी खराब असल्याचे जाणवले. त्यांच्या चेहऱ्यावर तब्येतीचा परिणाम दिसत होता. त्यांना काही राजकीय आजार असेल असे वाटत नाही. पण निश्चित ते आजारी असल्याचे दिसत आहेत. महायुतीच्या अनेक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. आम्ही काही लोकप्रतिनिधी आमदारांशी बोललो, ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. समतोल राखला नाही, याचीही खंत आहे. संधी मिळेल अशी अपेक्षा होती पण ती मिळाली नाही म्हणून नाराजी पाहायला मिळत आहे”, असेही शशिकांत शिंदेंनी सांगितले.