देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कुणा-कुणाची वर्णी लागणार? वाचा संभाव्य यादी…

Devendra Fadnavis Cabinet Prospective List : येत्या 14 डिसेंबरला फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या मंत्रिमंडळात कुणा- कुणाचा समावेश असणार? याबाबतची संभाव्य यादी समोर आली आहे. कुणाची वर्णी लागणार? वाचा सविस्तर बातमी...

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कुणा-कुणाची वर्णी लागणार? वाचा संभाव्य यादी...
देवेंद्र फडणवीस, एनाथ शिंदे, अजित पवार
Image Credit source: ANI
| Updated on: Dec 10, 2024 | 9:12 AM

5 डिसेंबरला महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांचा शपथविधी पार पडला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा अल्पावधीचा असल्याने केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा शपथविधी झाला. इतर मंत्र्यांचा शपथविधी झाला नाही. मात्र आता हिवाळी अधिवेशनाआधी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे. या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार? शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोणत्या आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाची संभाव्य यादी टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे.

शिवसेना संभाव्य मंत्री

१. उदय सामंत

२. तानाजी सावंत

३. शंभूराजे देसाई

४. दादा भुसे

५. गुलाबराव पाटील

६. राजेश क्षीरसागर

७. आशिष जैस्वाल

८. प्रताप सरनाईक

९. संजय शिरसाट

१०. भरत गोगावले

राष्ट्रवादी संभाव्य मंत्री

१. आदिती तटकरे

२. हसन मुश्रीफ

३. छगन भुजबळ

४. धनंजय मुंडे

५. धर्मरावबाबा अत्राम

६. अनिल पाटील

७. दत्ता भरणे

संभाव्य मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब

केंद्रीय नेतृत्वाने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपच्या मंत्र्यांच्या नावावर मात्र पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डमध्ये चर्चा करून संभाव्य मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यांची संभाव्य मंत्र्यांची यादी पार्लमेंट्री बोर्डासमोर सादर केल्याचीही माहिती आहे. 14 डिसेंबरला काही जणांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रीपदाची, तर काहींच्या गळ्यात राज्यमंत्री पदाची माळ पडणार आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

मंत्रिमंडळ विस्तार कधी?

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नावे दिल्लीत पोहोचली आहेत. केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी नावे पाठवण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. येत्या 14 डिसेंबर रोजी शपथविधी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती दिल्लीतील वरिष्ठ सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे.