
Weather Update : डिसेंबर महीना संपत आला असून काहीव दिवसांतच नव्या वर्षाची पहाट उगवेल. मात्र देशभरासह राज्यात अजूनही थंडीचा जोर कायम असून सकाळी आणि रात्री हुडहुडी भरायला वातावरण असलं तरी दिवस वर चढल्यावर सूर्यनारायणाच्या दर्शनाने थोडं उबदार वाटतं. रात्री उशीरा गार वारे वहात असून पहाटेही गारवा चांगलाच वाढलेला दिसतोय. संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढलेला दिसत असून पुढचे काही दिवस वातावरण असंच असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेला आहे. मुंबईसहर राज्याता काही ठिकाणी पुढले 6 दिवस तापमानात घट होण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
थंडीचा जोर वाढलेला असतानाच हवेचा दर्जाही घसरत चालल्याची माहिती समोर आलू असून काही ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक 195 इतका वर, अती वाईट श्रेणीत पोहोचला आहे. यामुळे नागरिकांना दुषित हवेत श्वास घ्यायला लागत असून ही चिंतेची बाब आहे.
राज्यात वाढला थंडीचा कडाका
उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये थंडीचा अलर्ट जारी केल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असल्याचे समजते. उत्तर व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान 10 अंशाच्या खाली गेले असून त्यामुळे नागरिकांना मात्र चांगलीच हुडहुडी भरली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही दिवस उरले असताना, संपूर्ण उत्तर आणि ईशान्य भारतात हवामानाने रौद्र रूप धारण केले आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये 1 जानेवारी 2026 पर्यंत दाट धुक्याचा इशारा देण्यात आला.
मात्र उत्तर भारतातील या बदलत्या हवामानाचे पडसाद हे महाराष्ट्रावरही पडू शकतात आणि इथल्या हवामानातही बदल होऊ शकतो. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातही थंडीचा जोर कायम राहू शकतो. या वर्षाअखेरीस तसेच नवीन वर्षाच्या सुरूवातीला देखील महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानात घट होऊन गारवा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः पहाटेच्या वेळी काही जिल्ह्यांमध्ये धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळू शकते.
तापमानाचा पारा घसरला
मुंबईसह राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ झाली आहेच, पण त्यामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक 195 इतक्या वर, अती वाईट श्रेणीत पोहोचला आहे. मुंबईकर सध्या दाट धुकं आणि थंडीच्या लाटेमुळे गुलाबी थंडीचा अनुभव घेताना दिसत आहेत.
२७ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्याचं नोंदवण्यात आलं. राज्यात गुलाबी थंडीचा मुक्काम वाढला असून हवामान खात्याने आणखी काही दिवस तापमानाचा पारा घसरलेला राहील, असाही अंदाज वर्तवला आहे. मुंबईत तापमान 22 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. दिवसा थंडी, तर दुपारी उकाडा जाणवू शकतो. मुंबईत पुढील ६ दिवस किमान तापमान १८ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत असेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.