एका पाठोपाठ घरातल्या तिघांच्या चिता पेटल्या, भंडाऱ्यात कोरोनानं मृत्यूचं तांडव !

| Updated on: Jun 02, 2021 | 3:00 PM

भंडारा तालुक्यातील माटोरा गावात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा काही तासाच्या अंतरानं मृत्यू झाला. त्यामुळे बोरकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

एका पाठोपाठ घरातल्या तिघांच्या चिता पेटल्या, भंडाऱ्यात कोरोनानं मृत्यूचं तांडव !
कोरोनामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा अवघ्या काही तासांत मृत्यू
Follow us on

भंडारा : कोरोनामुळे एकाच कुटुंबातले पाच जण काही दिवसाच्या फरकानं मृत्यूमुखी पडल्याचं आपण वाचलं आहे, ऐकलं आहे. पण भंडाऱ्यात जे घडलं ते मात्र मुळासकट हादरवणारं आहे. भंडारा तालुक्यातील माटोरा गावात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा काही तासाच्या अंतरानं मृत्यू झाला. त्यामुळे बोरकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ह्या एका घटनेनं पूर्ण जिल्हा हादरुन गेला. (Three members of the same family died a few hours apart in Bhandara)

भंडारा तालुक्यात माटोरा नावाचं गाव आहे. या गावात ग्रामपंचायतनं कोरोनाच्या चाचण्या केल्या. संपूर्ण गावाची चाचणी करण्यात आली. त्यात बोरकर कुटुंबातील 7 सदस्यांपैकी 3 जणांची चाचणी पॉजिटीव्ह आली. महादेव बोरकर, वय वर्ष 90 त्यांची पत्नी पार्वताबाई बोरकर, वय वर्ष 85 आणि मुलगा विनायक बोरकर वय वर्ष 55 असा तिघांचा समावेश होता. महादेव बोरकर हे सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरु होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कार करुन सगळे नातेवाईक घरी परतत असतानाच पार्वताबाईंचाही कोरोनाने बळी घेतला.

कोरोनामुळे एकाच कुटुंबांतील तिघांचा काही अवघ्या काही तासांत मृत्यू

..आणि एका पाठोपाठ तीन चिता पेटल्या

काही तासाच्या फरकानं पती-पत्नी दोघेही कोरोनानं हिरावले गेले. महादेव गुरुजींचे अंत्यसंस्कार करुन परतलेले नातेवाईक पुन्हा पार्वताबाईंच्या अंत्यसंस्काराला गेले. दोघांचेही अंत्यसंस्कार झाले असतानाच, मुलगा विनायकराव यांचीही ऑक्सिजन पातळी खालावली. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतानाच त्यांचीही प्राणज्योत मालवली. शेवटी नातेवाईकांनी त्यांचेही अंत्यसंस्कार पार पाडले. नवरा-बायको आणि मुलगा असे तिघेही जण प्रत्येकी तीन तासाच्या फरकानं मृत्यूमुखी पडले. विनायकरावांच्या पाठीमागे पत्नी आणि तीन मुले आहेत. एकाच घरातल्या तिघांच्या चिता पेटलेल्या बघून अख्खं गाव हळहळलं.

15 दिवसांत कोरोनामुळे अख्खं कुटुंब संपलं

एप्रिल महिन्यात पुण्यातही अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. अवघ्या 15 दिवसांत जाधव कुटुंबातील 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव आणि बहीण वैशाली गायकवाड यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पूजेच्या निमित्ताने हे कुटुंब एकत्र आलं होतं. पूजेनंतर घरात कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर एकामागोमाग एक अशा पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे जाधव कुटुंबच संपलं.

पूजेच्या निमित्ताने एकत्र

जाधव कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी घरात पूजेचं आयोजन केलं होतं. या पूजेच्या निमित्ताने घरातील सर्वजण एकत्र आले होते. एकाच कुटुंबातील सर्वजण असल्याने ते काहीसे निश्चिंत होते. मात्र एकामागोमाग एकाला कोरोनाने गाठलं. पुढे त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अवघ्या 15 दिवसात तब्बल 5 जणांचा मृत्यू झाला.

इतर बातम्या :

रुग्णालयातील 80 टक्के जागा अधिग्रहित, नियम सर्वांना सारखे, डॉक्टर असोसिएशन विरोधात नाशिकचे जिल्हाधिकारी आक्रमक

Health Tips : उन्हाळ्यात काढा पिणं किती उपयुक्त?, कधी आणि केव्हा प्यावा काढा; वाचा सविस्तर!

Three members of the same family died a few hours apart in Bhandara