
रामू ढाकणे, टीव्ही९ प्रतिनिधी : राज्यातील 288 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून महायुतीचाच दणदणीत विजय झाला. दरम्यान बीड जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या परळी वैजनाथ आणि परभणीच्या गंगाखेड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, मात्र या दोन्ही ठिकाणी मुंडे यांनी मोठा विजय मिळवला आहे. विरोधकांचे कठोर आव्हान मोडून काढत मुंडे यांनी आपला बालेकिल्ला कायम राखला. याचदरम्यान आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी एक मोठे विधान केलं असून सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे. ‘बजरंग सोनवणे, प्रकाश सोळंके आणि विजयसिंह पंडित यांनी आता धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांचा नाद सोडावा, जरांगेच्या नादी लागले तर 2029 ला घरी जावं लागेल. ओबीसी हवामान खात्याचा इशारा’ असं म्हणत नवनाथ वाघमारे यांनी हल्लाबोल केला आहे.
जे जे लोक या बिनडोकाच्या नादी लागतील, त्यांना घरचा रस्ता दाखवू,असं म्हणत नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे यांच्यासह सोळंके, पंडित आणि बजरंग सोनवणे यांच्यावर हल्ला चढवला. एवढंच नव्हे तर प्रकाश सोळंके यांचा बिनडोक म्हातारा म्हणून वाघमारे यांनी उल्लेख केला. बीडमध्ये जाऊन जल्लोष करणे म्हणजे खऱ्या अर्थाने लग्न आहे लोकांचं आणि नाचत येड्या….. अशा शब्दांत नवनाथ वाघमारे यांनीविजयसिंह पंडित यांना खोचक टोलाही लगावला.
ज्यांनी ओबीसींना त्रास दिला, त्यांना जागा दाखवू
बीडच्या निकालावरही वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली. पंडित हे खऱ्या अर्थाने ओबीसींच्या जीवावर निवडून आले, ओबीसी बांधवांनी ताकदीने त्यांना मतदान केलं होतं, कारण विधानसभेच्या अगोदर ते बिनडोक असणाऱ्या पाचवी नापास जरांगेच्या नादाला लागले नव्हते. पण या जे जे या पाचवी नापासच्या नादी लागले आणि ओबीसींना त्रास देण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांना ओबीसी आता त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
ज्यांच्या मनात जरांगे यांच्या विषयी जाण आहे त्यांना येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये झोपवल्याशिवाय ओबीसी स्वस्थ बसणार नाही असंही त्यांनी खडसावून सांगितलं.
दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाढण्याला काहीही अर्थ नसतो, पंडितांना खोचक टोला
विजयसिंह पंडित यांनी बीडमध्ये केलेल्या जल्लोषानंतर वाघमारे यांनी त्यांनाही टोला हाणला. ‘ प्रत्येक माणसाला स्वतःच्या गावात किंमत पाहिजे, पाहुण्याच्या गावात जाऊन दंड थोपटून काहीही अर्थ नसतो, खरं म्हणजे लग्न आहे लोकाचं, आणि नाचत येड्या……. , दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाढण्याला काहीही अर्थ नसतो, स्वतःच्या लग्नातच बुंदी वाढवून न्याय द्यावा,’ असं म्हणत त्यांनी विजयसिंह पंडितांना टोमणा मारला. विजयसिंह पंडित यांनी बीडमध्ये दंड थोपटून जल्लोष केला होता, त्यावर वाघमारेनी टीका केली.
बीड क्षिरसागरमुक्त होऊ शकत नाही, परळी मुंडेमुक्त होऊ शकत नाही,येवला भुजबळमुक्त होऊ शकत नाही. ज्या लोकांना जरांगेच्या जीवावर माज आला असेल, त्यांना येणाऱ्या काळात घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही असा पुनरुच्चार त्यांनी पुन्हा केला.