
येत्या २९ ऑगस्टला मराठा समाजाने एल्गार पुकारत मुंबईत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लाखो शेतकरी संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी येत्या 28 ऑक्टोबर रोजी मुंबईत एक भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या आंदोलनाची घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिव येथील आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. त्यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी दोन महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे.
आमदार कैलास पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर दोन महिन्यांच्या आत सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर मुंबईत मोठा मोर्चा काढण्यात येईल. या आंदोलनासाठी एक विशेष रणनीती तयार करण्यात आली आहे. यानुसार, पुढील दोन महिन्यांत राज्यभरात विभागवार मेळावे घेतले जातील. ज्यातून या आंदोलनाची व्याप्ती वाढवली जाईल. या आंदोलनात राज्यातील विविध राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. या मेळाव्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पुन्हा एकदा वाचा फोडण्याचा प्रयत्न केला जाईल.
येत्या 28 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मुंबईतील भव्य मेळाव्यात राज्यातील कानाकोपऱ्यातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनामागचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जातून पूर्णपणे मुक्त करणे हा आहे. ज्यामुळे त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडता येईल. मराठा आरक्षण आंदोलनाप्रमाणेच हे आंदोलनही सरकारसाठी एक मोठे आव्हान ठरू शकते, असे मत राजकीय विश्लेषकांचे आहे.
दरम्यान येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा आरक्षणासाठी भव्य आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. यासाठी हजारो मराठा आंदोलक आपल्या मागण्या घेऊन मुंबईत दाखल होणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारला अल्टिमेटम दिलं. मी आजपासून काहीही बोलणार नाही. मी सरकारला दोन दिवसांचा वेळ देतोय असे मनोज जरांगे यांनी सांगितले. त्यासोबत मनोज जरांगेंनी आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, असेही ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे मुंबईत येत्या २९ ऑगस्टला मराठा समाजाचे मोठे आंदोलन होणार आहे.